Political Breaking! बुलडाणा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या रडारवर!! राजधानीत 'मिशन ४५' वर बैठक; ना. दानवे यांच्यावर ' रावसाहेब' शोधण्याची जवाबदारी

 
बुलडाणा ( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यसभा पाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीत धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने या धामधुमीत आज मुंबईत मिशन ४५ वर विचार मंथन करून प्राथमिक रणनीती  ठरविल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार  बुलडाण्यासह   राज्यातील १६ लोकसभा  मतदारसंघ पक्षाचे नवीन  टार्गेट असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.

निवडणूक रणनीती ठरविण्यात इतर पक्षाच्या तुलनेत कितीतरी पुढे असलेल्या भाजपाने सन २०२४ मध्ये रंगणाऱ्या लोकसभा महासंग्रामची चालू वर्षापासूनच तयारी चालविली आहे. दोनेक महिन्यांपूर्वी पक्षाने मतदारसंघ निहाय प्रभारी नेमले होते. त्यात बुलडाणा मतदारसंघाची जबाबदारी धूर्त व मुरब्बी राजकारणी समजले जाणारे  ना. रावसाहेब दानवे यांच्यावर सोपविली. त्यांनी नियुक्ती नंतर जिल्ह्याला भेट देऊन बैठक घेतली. सध्याही ते सक्रिय आहे. 

..आणि बैठक

 दरम्यान विधान परिषदेच्या धामधुमीत  राजधानीतील प्रदेश कार्यालयात आज मिशन ४५ वर दीर्घ बैठक पार पडली. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. दुपारच्या सत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. सूत्रानुसार बुलडाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे समजते. सन १९८९  च्या लढतीत सुखदेव नंदाजी  काळे यांच्या रूपाने पक्षाने येथे पहिला विजय प्राप्त केला होता.

आता पुन्हा हा मतदारसंघ काबीज करण्याचे पक्षाचे मनसुबे आहेत.  २ आमदार, एक आमदार बंधू ,  माजी आमदार आणि एक वक्तृत्व, नेतृत्व चा संगम  असलेला मात्र सध्या ' उंबरठ्यावर ' असलेला फायर ब्रँड नेता असे पर्याय पक्षाकडे आहेत. त्यामुळे उमेदवार रुपी 'रावसाहेब' निश्चित करण्यासाठी ना. दानवे यांच्या नजीकच्या काळात  मातृतीर्थात भेटीगाठी, बैठका वाढल्या तर त्यात नवल नाहीच...