POLITICAL BREAKING: सैनिकांसह सूत्रांचाही अंदाज अचूक! जिल्हाप्रमुख बुधवत यांची मातोश्री वरील निष्ठा अन भगव्याशी इमान कायम!!
यापूर्वी 19 जुलैला बुलडाणा बाजार समितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जालिंदर बुधवत या कडवट सैनिकाने आपली भूमिका स्पष्ट न मांडता जिल्ह्यातील इतर पदाधिकारी व सैनिकांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय जाहीर करणार असे सांगितले.मुळात ती पत्रकार परिषद बाजार समितीत त्यांनी सभापती या नात्याने केलेल्या विकासाच्या चमत्कार संबंधित होती. पत्रकारांनी खूपच जोर लावला असता त्यांनी आपल्या परीने उत्तर देत घोषणेचा मुहूर्त सांगितला. त्यांनी सांगितलेला मुहूर्त पुढे पुढे सरकला तशी तशी मीडिया आणि सेना वर्तुळात चर्चा, तर्क ,वितर्क सुरू झाले.
आजी माजी खासदार शिंदेवासी अन...
त्यातच त्यांचे राजकीय गुरू तथा बुलडाण्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे शिंदेशाही त सामील झाले आणि नेते रुपी सरदार झाले. यावर कळस म्हणजे त्यांना पाठबळ देणारे व जे आपली 35 वर्षाची गौरवशाली कारकीर्द पणाला लावणार नाही असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सुद्धा बंडाचा अर्थात शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला! घाटाखालील जिल्हा प्रमुख शांताराम दाणे व काही जणांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. खासदारांचा बहुचर्चित दौरा जाहीर झाला. यापरिणामी चोहोबाजुनी पक्षांतर्गत राजकीय दडपणाची स्थिती निर्माण झाली. मात्र बुधवत गोटातून काहीच घोषणा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला .
यामुळे खासदारांच्या दौऱ्यात चित्र स्पष्ट होईल असा अंदाज होता. मात्र अधिकृत घोषणा न झाल्याने मीडिया अन सैनिकातील उत्सुकता शिगेला पोहोचली ! या पार्श्वभूमीवर बुलडाणा लाईव्ह ने संपर्क केला असता जिल्हा प्रमुख बुधवत यांनी शिनठोकपणे आपली भूमिका मांडली. आपण व आपली शिवसेना व उद्धवसाहेबावरील आपली अढळ निष्ठा किंचितही हलणार नाही. सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर शोकमग्न असल्याने चर्चेला थोडा विलंब लागला एवढंच असे त्यानी स्पष्ट केले. माझ्याप्रमाणेच घाटाखालील मंडळी बहुसंख्येने सेनेत कायम राहिली, याचं समाधान आणि अभिमान असल्याचे बुधवत यांनी या अनौपचारिक संवादात सांगितले. युवानेते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा मुहूर्त ठरला नसला तरी ती जंगी व दणकेबाज( निष्ठावानाचे शक्तिप्रदर्शन )च राहणार असे त्यांनी चर्चेअंती सांगितले.