नाकर्त्या राज्य सरकारने ओबीसी बांधवांची फसवणूक केली; कोर्टाने मुस्काटात मारल्यावर तरी अक्कल ठिकाणावर यावी! आमदार श्वेताताई महाले यांचा घणाघात
May 4, 2022, 18:38 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- नाकर्त्या राज्य सरकारने ओबीसी समाज बांधवांची फसवणूक केली आहे. कोर्टाने मुस्काटात मारल्यावर आता तरी राज्य सरकारची अक्कल ठिकाणावर यावी अशी घणाघाती टीका ट्विटर वरून चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ दिवसांच्या आत जाहीर कराव्या असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाजपा आमदार श्वेताताई महाले यांनी राज्य सरकारच्या कारभाराला दोष देऊन संताप व्यक्त केला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या थोबडात सणसणीत चपराक मारली आहे. राज्य सरकारने न्यायालयात ओबीसी समाजाची नीट बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती. मात्र ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये हेच महाविकास आघाडी सरकारच्या मनात होत. ओबीसी समाजाविरुद्ध कुटील कट राज्यसरकारने रचल्याचे यावरून समोर आले आहे. घरात बसून राज्यकारभार केल्यावर काय होणार म्हणा, कोर्टाने मुस्काटात मारल्यावर आतातरी अक्कल ठिकाणावर यावी असे ट्विट श्वेताताई महाले यांनी केले आहे.