स्थलांतरित मतदारांनी उडवली उमेदवारांची झोप! जिल्ह्यातल्या २७९ गावांत ग्रामपंचायत निवडणुकांमुळे वातावरण तापले..!
बुलडाणा जिल्ह्याची ग्रामपंचायत निवडणूक बंडखोरी, आपसी मतभेद, भाऊबंदकी मुळे चांगलीच रंगात आली आहे. दरम्यान जिंकून येण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करत आहेत. सद्यस्थितीत उमेदवारांची स्थलांतरित मतदारांनी झोप उडवली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत. या विस्थापित मतदारांना परत आणून त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा? अशा पेचात उमेदवार अडकले आहेत. एका कुटुंबातील चार ते पाच मतदार असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कसे आणावे? त्यांना आणण्यासाठी खर्चही अधिक येणार असल्याने काय करावे? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
व्यूहरचना,गाठीभेटी....
प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी व्यूहरचना आखून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. तसेच आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. त्यापैकी आपल्या जवळचे कोण? याबाबत मतदार याद्यांची तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगाराच्या शोधात तसेच अन्य कारणामुळे गाव सोडून शहरात गेले आहेत. त्यामुळे या मतदारांची मते कशी मिळावावीत?, याची तडजोड सुरू आहे. दुरावलेली मते प्रत्येकालाच हवी असल्याने हालचाली सुुरू आहेत.