'त्या' छायाचित्राने जागविल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या स्मृती! 38 वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमानंतर वासनिकांसह अनेक जण झाले मोठे नेते!!; वासनिक झाले  बुलडाण्याचे खासदार

 
बुलडाणा ( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक व अविनाश पांडे यांनी  समाज माध्यमावर  शेअर केलेल्या दुर्मिळ व ऐतिहासिक छायाचित्रांनी जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्या जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मिळाला ! यामुळे हे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे चित्र आहे.  व्हायरल होत असलेले फोटो तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जंगी समारंभाचे असून त्या कार्यक्रमानंतर मुकुल वासनिकांसह अनेक नेत्यांचे राजकीय भाग्य उजळल्याने तो जंगी समारंभ एकप्रकारे ऐतिहासिक ठरला होता.

 एके काळी विदर्भासह देशात प्रबळ विद्यार्थी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनएसयुआयच्या स्थापना दिनानिमित्त शेअर करण्यात आलेले हे फोटो नागपूर येथे ९ एप्रिल १९८४ रोजी पार पडलेल्या समारंभाचे आहेत.  तत्कालीन  प्रभावी नेते श्रीकांतदादा जिचकार यांच्या पुढाकाराने नागपूर विद्यापीठच्या  मैदानात हा कार्यक्रम पार पडला आणि प्रचंड यशस्वी ठरला होता.

पंतप्रधान  इंदिरा गांधी ,  मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासह राज्य व देशातील मातब्बर नेते यावेळी हजर होते. व्यासपीठावर जीचकरदादा,  मुकुल वासनिक, अविनाश पांडे, यांना स्थान मिळाले.  या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  विजय सावळे, संतोष आंबेकर, बाळासाहेब खेडेकर, शशिकांत खेडेकर, अशोक खासबागे, दत्ता चव्हाण,  आदी बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते दिमतीला होते. 

 राजकारणाला निर्णायक वळण

दरम्यान त्या कार्यक्रमाने राजकारणाने निर्णायक वळण घेतले.  तसेच अनेक नेत्यांचे राजकीय भाग्य उजळले . नागपूरकर मुकुल वासनिकांना एनएसयुआय चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पद व बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्यावेळी नुकतीच पंचविशी ओलांडलेला हा नेता सभागृहमधील सर्वात तरुण खासदार ठरला होता. ( पिताश्री तथा खासदार बाळकृष्ण वासनिक यांना रिपीट न करता पुत्राला ही मोठी संधी देण्यात आली होती.)

अविनाश पांडे राज्य अध्यक्ष आणि आमदार झाले. सुनील देशमुख यांना विधानसभेत संधी मिळाली.  इतर जण उशिराने का होईना राजकारणात मोठे झाले. शशिकांत खेडेकर याना आमदारकी मिळाली मात्र,  ती सेनेत गेल्यावर! मात्र संतोष आंबेकर, विजय सावळे  यासारख्या नेत्यांना संघटनात्मक पदे वगळता मोठ्या निवडणुकीत उमेदवारीने कायम हुलकावणी दिली. या सर्व राजकीय आठवणींना त्या काही फोटोंनी उजाळा दिला आणि जिल्ह्यातील अनेक नेते जुन्या आठवणीत रमले...