'तळ्यात मळ्यात' मुळे खासदार जाधवांची २ मिनिटे 'ऑनलाईन' हजेरी? ४ नेत्यांनी गाजविला निष्ठावंतांचा हाऊसफुल्ल मेळावा!! 'निम का पत्ता ' च्या गजरात बुलडाण्यात शिवसेना समर्थन रॅली
गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज ,२७ जूनला पार पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना समर्थनार्थ निष्ठवंतांचा जंगी मेळावा पार पडला. हा मेळावा बुलडाणा विधानसभा मतदारसंघापुरता असला तरी सेनेच्या जिल्ह्यातील वाघांनी हजेरी लावली. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचे संघटन कौशल्य व सेनेवरील सैनिकांची निष्ठा दर्शविणारा हा मेळावा ठरला. खासदार येणारच अशी घोषणा करीतच त्यांच्या अपरोक्ष पदाधिकाऱ्यांच्या भाषणांना सुरुवात करण्यात आली
टायगर अभि जिंदा है...
बंडखोर आमदारांवर तुटून पडलेल्या नरेंद्र खेडेकरांनी ' टायगर अभि जिंदा है' दाखवून दिले. यांना काहीतरी मोठे मिळाले तेंव्हाच ते गेले. यामागे प्रत्येकी ५० कोटींची डील झाल्याचा आरोप करून सुरत ला जाण्यापूर्वी २५ व बहुमत सिद्ध करतांना च्या मतदानापूर्वी उरलेले २५ कोटी असा व्यवहार असल्याचे ते म्हणाले. या साऱ्यांचा माज भाजपच्या बळावर असल्याची टीका त्यांनी केला. सेना सोडून जेजे गेले ते लंबे झाले आहे हा इतिहास असून आत्ताही काही वेगळे होणार नाही असे सांगून आता गद्दार गेल्यामुळे सर्वांना संधी आहे, हे लक्षात घ्या असे सूचक विधान त्यांनी केले.
मेळाव्याचे सुसज्ज नियोजन करणारे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचा आजचा मुडच आक्रमक होता. बंडखोरी सेनेला नवीन नाही . पण कोणीही गेलेतरी सेना वाढतच गेली हा इतिहास आहे. कोणीही गेले तरी बुलडाणा विधानसभा मतदारसंघावरील सेनेचा भगवा फडकतच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. ही बंडाळी भाजपा स्पॉन्सर्ड असून याचा खर्च ३ हजार कोटी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे , या नेत्याची त्यांनी खिल्ली उडविली. सेनेने त्यांना सर्व काही दिले पण हे गद्दार सर्व विसरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. १९९५ मध्ये एसटीने बुलडाण्यात येणाऱ्या सैनिकाला जिल्हा प्रमुख, बाजार समिती संपर्क प्रमुख ही पदे दिली. असा चमत्कार केवळ ठाकरे कुटुंब अन शिवसेनाच करू शकते असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.
नव्वदीच्या दशकात सेना गाजविणारे ज्येष्ठ नेते छगन मेहेत्रे यांनी साहेबांनी सांगितले म्हणून आम्ही संयम ठेवून आहोत. पण गद्दार आमदारांच्या गाड्या नाही फोडल्या तर नाव लावणार नाही असा इशारा त्यांनी दिला. महिला आघाडीच्या चंदा बढे यांनी जहाल भाषण करून व बंडखोरांची एकेरी भाषेत खिल्ली उडवीत सैनिकांच्या टाळ्या घेतल्या. खा.जाधव यांनी मोबाइल च्या मदतीने केलेल्या मनोगतातून, बंडखोरी ही सेवेसाठी नवीन नाही , पण जे गेले ते संपले हा इतिहास आहे. त्यामुळे सैनिकांनी विचलित न होता पक्ष कार्य करीत राहावे असे आवाहन केले. व्यासपीठावर धीरज लिंगाडे, भोजराज पाटील, संजय हाडे, लखन गाडेकर, बाबुराव मोरे, चौथनकर, संजय मोटे, आदी उपस्थित होते . संचलन तालुका प्रमुख गाडेकर यांनी केले
मेळाव्यानंतर गर्दे वाचनालय, कारंजा चौक, कौर्ट रोड ते जिल्हाधिकारी कार्यलय अशी समर्थन रॅली काढण्यात आली.