देऊळगावराजात मनसेला खिंडार! आ. डॉ शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..!!
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शेख कादिर भाई यांच्यासह शेकडो युवकांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्थानिक कोटकर निवास येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थितांना संबोधित केले
जाहिरात
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वसमावेशक नेतृत्व आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देणारे तसेच शेतकरी , कष्टकरी ,कामगार यांच्या कल्याणासाठी ते झटत असतात. त्यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा असे आवाहन यावेळी आ. डॉ. शिंगणे यांनी केले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक समाजातील निष्ठावंत नेते शरद पवार साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या कल्याणाचे निर्णय घेतले, मात्र केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातल्या भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी खालच्या पद्धतीचे राजकारण केले. इडी, सीबीआय, एनसीबी यासारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून केंद्र सरकारने अतिशय घाणेरडे राजकारण केल्याचे ते म्हणाले. मात्र जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याने काळजी करण्याचे कारण नाही असेही डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले.
अर्पित मिनासे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड होते. यावेळी हाजी आलम खान कोटकर , माजी नगराध्यक्ष श्री. जिंतुरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव मस्के, गणेश सवडे, रंगनाथ कोल्हे, माजी नगरसेवक प्रदिप वाघ, सुनील शेजुळकर तसेच शेकडो युवक उपस्थित होते.