आमदार संजय रायमुलकरांचे उपोषण फळाला! रात्री उशिरापर्यंत अमरावतीचे अधिकारी पत्र घेऊन मेहकरात पोहचणार!  मंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना लावले कामाला

 
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  
मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर आज उपोषणाला बसल्याने एकच खळबळ उडाली.  राज्यात सत्ता असताना व शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली. मतदारसंघातील आदिवासीबहुल क्षेत्रात रस्ते विकासासाठी निधी मिळावा या मागणीसाठी ते रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले. ही बातमी पसरताच मंत्रालय स्थरावर हालचाली झाल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच अधिकाऱ्यांना कामाला लावले. त्यामुळे आमदार संजय रायमुलकर यांच्या उपोषणाला यश मिळण्याची चिन्हे आहेत. रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत मेहकरात पत्र घेऊन पोहचणार आहेत. ते पत्र मिळाल्यावर आमदार रायमुलकर उपोषण सोडू शकतात.

आमदार संजय रायमुलकर यांनी याआधी अनेकदा या कामांसाठी पाठपुरावा केला होता. संबधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला मात्र मागणीला यश मिळत नसल्याने पाहत त्यांनी थेट उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.  मेहकर मतदारसंघात येणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांना निधी मिळावा या मागणीसाठी ते सकाळपासून उपोषणाला बसले आहेत.

जनुना - शेलगाव देशमुख या रस्त्यासाठी ९० लाख,  माळेगाव - मारोतीपेठ या रस्त्याच्या कामासाठी  ६० लाख, भोसा - माळेगाव या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख, राजगड - विश्र्वीसाठी ७० लाख, चींचाळा जोडरत्यासाठी ६० लाख, जनुना जोडरस्त्यासाठी ७० लाख  व भोसा-  मेळजानोरी या रस्त्यासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार संजय रायमुलकर यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पडावी यांच्याकडे केली आहे.  मात्र सत्ता असूनही निधी मिळत नसल्याने त्याने उपोषणाला बसावे लागले .