सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून आमदार संजय कुटेंचा राज्य सरकारविरुद्ध संताप!म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा घात केला
May 4, 2022, 18:15 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ दिवसांच्या आत जाहीर कराव्यात असे आदेश आज,४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेश सरचिटणीस , आमदार संजय कुटे यांनी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ओबीसी समाजाचा घात केल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून फक्त टाईमपास केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयाने इम्पेरिकल डाटा मागितला, ओबीसी समाजाने आंदोलने केली मात्र राज्य सरकारने लक्ष दिले नाही. ओबीसी नेतृत्व संपविण्याचा घाट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रचला होता. ओबीसी नेतृत्व पुढे येऊ नये हा डाव त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून आज साध्य केला. त्यामुळे ओबीसी समाजात संताप आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांनी केवळ मेळावे आणि चिंतन बैठका घेऊन टाईमपास केला असेही ते म्हणाले. आता ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारला सोडणार नाही असेही संजय कुटे म्हणाले.