आ.संजय गायकवाडांचे नरेंद्र खेडेकरांना उत्तर, म्हणाले २२ वर्ष सेना सोडुन काँग्रेस सोबत राहणाऱ्यानी निष्ठा शिकवू नये! संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली! 

अडीच वर्षात मातोश्री अन् वर्षांवर प्रवेश नव्हता! जे घडलं ते सगळ सांगितलं..! म्हणाले यापुढील सगळ्या निवडणुका भाजपला सोबत घेऊन!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आज, १८ दिवसानंतर बुलडाणा शहरात दाखल झाले. पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सर्व घटनाक्रम सांगितला. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी हा उठाव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने शिवसेना संपविण्याचा डाव रचला होता .सत्तेत असून काहीच फायदा नव्हता. शिवसेना आमदारांची कामे होत नव्हती. आम्हाला मातोश्री अन् वर्षांवर थेट प्रवेश नव्हता त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला अशी खदखद आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. बुलडाणा जिल्ह्यात आमदारांविरोधात आंदोलन करणाऱ्यांचा सुद्धा त्यांनी रोखठोक भाषेत समाचार घेतला.

बाळासाहेबांचा आदेश आल्यानंतर जीवाची बाजी लावून आम्ही आदेशाचे पालन केले. मातोश्री आणि वर्षावर आम्हाला स्वतःला प्रवेश मिळाला नाही. एखाद्या वेळेस बैठकीला बोलावले तर मधली लोक आमच्याशी बोलायची मात्र साहेबांपर्यंत आमचा आवाज पोहचू दिल्या जात नव्हता. ही सगळ्या शिवसेना आमदारांची घुसमट होती. सगळे शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन रडायचे. ते शिवसेना आमदारांसाठी काँगेस, राष्ट्रवादिच्या मंत्र्यांना भांडायचे. आमदारांसाठी स्वतःचा राजीनामा द्यायची त्यांची तयारी होती. त्यामुळे हे सगळे आमदार आज त्यांच्यासोबत आहेत असे आ. गायकवाड म्हणाले. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेतून शिंदेसाहेबांना बाहेर ठेवण्यात आले आणि ज्यांचे पक्षासाठी काही योगदान नाही अशा कालच्या पोरांच्या हाती कारभार देण्यात आला. आम्ही बेइमानी केली नाही .आधी ३० आमदार होते त्यानंतर आणखी २० आमदार आले. अनेकांनी मंत्री पद सोडले. ३० - ३५ वर्षांच्या संघर्षानंतर मी आमदार झालो. मात्र हिंदुत्वासाठी आमदारकी पणाला लावली असे आ. गायकवाड यावेळी म्हणाले.
   
बुलडाणा शहरात संभाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने माझी वरिष्ठांकडे तक्रार केली की आमदार गायकवाड घेत असलेल्या कार्यक्रमामुळे आमचा मतदार दुखावला आहे असेही संजय गायकवाड म्हणाले. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे ते आम्ही कधीही सोडणार नाही. शिवसेना भाजप युती  म्हणून निवडणुका लढलो आमच्या पोस्टरवर भाजप नेत्यांचा फोटो होता असेही आ. गायकवाड म्हणाले. मात्र गेल्या अडीच वर्षात निधिवाटपात मोठा भेदभाव झाला. पालकमंत्र्यांनी त्यांच्या नगरसेवकाला ४० - ५० लाख रुपयांचा निधी दिला मात्र सेनेच्या नगरसेवकाला १ लाख रुपये सुद्धा दिले नाही असा आरोप आ. गायकवाड यांनी यावेळी केला.
  
आमची मागणी फक्त एवढीच ...

२१ तारखेपासून २७ तारखेपर्यंत आमची केवळ एकच मागणी होती. ती म्हणजे काँग्रेस - राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडा. मात्र साहेबांनी वर्षा बंगला सोडला, मुख्यमंत्री पद सोडायला तयार, गेलेल्या आमदारांना सोडायला तयार मात्र ते राष्ट्रवादीला सोडायला तयार नव्हते. काँग्रसचे चिल्लर चिल्लर कार्यकर्ते चौकाचौकात आमची टिंगल टवाळी करत होते. काँग्रेसचे इथले माजी आमदार आम्हाला शिव्या द्यायचे. भविष्यात लढाई यांच्यासोबतच होती त्यामुळे आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे आ. गायकवाड म्हणाले.
  
नरुभाऊ खेडेकर तुम्ही आम्हाला शिकवू नका ...!
 
आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर काही ठिकाणी तोडफोड झाली. पुतळे जाळण्यात आले. आमची आमदारकी रद्द होऊन आपल्याला आमदारकी मिळेल असे ज्यांना वाटत होते ते यात आघाडीवर होते..गेली ती विष्टा आणि राहिली ती निष्ठा असे नरेंद्र खेडेकर म्हणाले मात्र जे शिवसेना सोडून २२ वर्षे काँगेससोबत राहिले त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असे आ. गायकवाड यावेळी म्हणाले.
  
यापुढील सगळ्या निवडणुका भाजपसोबत..

 भाजपसोबत आमची नैसर्गिक युती होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्याला आता पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. आता यापुढील नगरपालिका ,जिल्हा परिषद निवडणूक व सर्व निवडणुका आता भाजपला सोबत घेऊन लढविण्यावर एकमत झाल्याचे महत्वपूर्ण विधान आ. संजय गायकवाड यांनी केले.
  
संजय राऊत ने राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली..!

 संजय राऊत आम्हाला डुक्कर , रेडे, गटार म्हणत होते. लोकांना चिथावणी देत होते. आमचे पुतळे जाळायला सांगत होते. संजय राऊतने राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती असा आरोपही त्यांनी केला. हे सगळ घडत असताना १५ दिवसाआधी खा.जाधव यांच्यासोबत चर्चा झाली होती असेही आ. गायकवाड म्हणाले. यापुढील काळात एकनाथ शिंदे यांना बुलडाणा शहरात बोलवणार असून त्यांच्या माध्यमातून बुलडाणा शहराचा व जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे आ. गायकवाड यावेळी म्हणाले.