काँग्रेसला "हर्ष-वर्धन' मिळवून देण्यात सपकाळ पडले कमी!; पंजाबमध्ये पाणीपतचे ठरले भागीदार!!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे अतिशय विश्वासू मानले जातात. जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष अन्‌ थेट आमदार अशी राजकीय कारकीर्द राहिलेले सपकाळ देशस्तरावर काँग्रेसमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. पक्षातील पदांच्या बाबतीत त्‍यांनी मुकुल वासनिकांना टक्कर दिली असली तरी, या पदांना न्याय देताना मात्र ते कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. पक्षश्रेष्ठींनी पंजाबसारख्या महत्वाच्या राज्याचे सहप्रभारी म्हणून त्यांना नियुक्‍त केले होते. मात्र याही वेळेला त्‍यांच्या पदरात अपयशच आले. भाजपविरोधी लाट राज्‍यात असताना आणि यामुळे काँग्रेसला मोठी संधी असतानाही अक्षरशः पाणीपत झाले. जेमतेम १८ जागा पदरात पडल्या. त्‍यामुळे सपकाळ पुन्हा एकदा कमी पडले, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ७७ जागा जिंकून काँग्रेसने पंजाब काबीज केले होते. यावेळी झालेल्या घसरणीचे खापर तिथे ज्‍या ज्‍या नेत्‍यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्‍यांच्यावर फोडण्यात येत आहे. यातून हर्षवर्धन सपकाळही सुटले नाहीत. देशभरात मोदी लाट असताना सपकाळ २०१४ मध्ये बुलडाण्यात ४६ हजार ४९५ मते घेऊन निवडून आले होते. आमदार असतानासुद्धा त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी होती. त्यामुळे दिल्ली, मुंबईत जास्त अन्‌ बुलडाण्यात कमी असा त्‍यांचा वावर राहिला. गांधी कुटुंबियांचा विश्वास त्यांना जिंकता आला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत विश्वास दाखवलेल्या ४६ हजार लोकांचा विश्वास त्यांना जपता आला नाही, अशी चर्चा आजही होत असते.

२०१९ ला आमदार झालेल्या संजय गायकवाड यांना सपकाळ यांच्यापेक्षा दुप्पट ६७ हजार ७८५ मते मिळाली. बुलडाणा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले, हीच गटबाजी सपकाळ यांच्या २०१९ च्या पराभवासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. आता आगामी निवडणुकीसाठी बुलडाण्यातून उभे राहायला अनेक इच्‍छुक तयार झाले आहेत. बुलडाण्यातील दारूण पराभवानंतरही सपकाळ यांना देशस्तरावरील मोठी जबाबदारी देण्यात आली. मात्र तिथेही ते कमीच पडल्याचे दिसून येते. अर्थात याला त्‍या त्‍या राज्यातील काही समिकरणेही जबाबदार आहेत, पक्षाप्रतीही नाराजीही कारणीभूत आहेत, मात्र तरीही ही नाराजी कमी करणे आणि समिकरणे जुळविणे सपकाळ आणि त्‍यांच्या सहकाऱ्यांना जमले नाही. परिणामी आम आदमी पार्टीने तिथे काँग्रेसला धूळ चारली.

पुढे काय??
सातत्‍याने स्वतः पराभवाला सामोरे जाणाऱ्या आणि पक्षालाही नेणाऱ्या सपकाळांबद्दल पक्षश्रेष्ठी पुढे काय निर्णय घेणार, याबद्दल जिल्ह्यातील त्‍यांच्या विरोधकांत उत्‍सुकता वाढली आहे. मात्र मोताळा नगरपंचायत निवडणुकीत आशेचा किरण दाखवणारा विजयसुद्धा दुर्लक्षित करण्यासारखा नाही, हेही तितकेच खरे!