हु$$ श! ठरला मुहूर्त एकदाचा!! उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार; जिल्ह्याला स्थान मिळण्याची  मात्र धूसर शक्यता

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जवळपास दीडेक महिन्यापासून किमान १० मुहूर्त होऊनही रखडलेल्या आणि विरोधी पक्ष तर सोडा  पब्लिक साठी देखील चेष्टेचा विषय ठरलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या ( मर्यादित का होईना) मुहूर्त अखेर ठरलाय! उद्या ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे. मात्र या विस्तारात जिल्ह्याला स्थान मिळण्याची फारच कमी शक्यता  असल्याचे चित्र आहे. 

उद्या  सकाळी ११ वाजता राजभवन मधील दरबार हॉल मध्ये शपथ विधी सोहळा पार पडणार आहे. मात्र हा विस्ताराचा पहिला टप्पा असल्याने उद्या १५ आमदारांनाच लाल दिवा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला ८ तर शिंदे गटाला ७ मंत्रीपदे मिळणार असल्याचे मानले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

चर्चेतील हॉट फेव्हरेट

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह विभाग देण्यावर एकमत झाल्याचे समजते. त्याशिवाय पहिल्या यादीत सुधीर मुनगंटीवार,  चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, प्रवीण दरेकर, बबन लोणीकर , रवींद्र चव्हाण आणि अनपेक्षितपणे नितेश राणे यांचेही नाव असण्याची दाट शक्यता आहे. 
बंडखोर गटातर्फे दादा भुसे, दीपक केसरकर, उदय सामंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटी ल, ही नावे  चर्चेत आहे.  कथित टीईटी घोटाळ्यामुळे सत्तार यांच्या नावावर फुली लागू शकते. 

जिल्ह्याचे काय?

या गदारोळात  देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू जळगाव जामोदकर संजय कुटे यांच्या संधीची पण चर्चा आज संध्याकाळी सुरू झाली. मात्र पाटील यांना संधी नक्की असल्याने कुटे यांची शक्यता धोक्यात आल्याचे मानले जात आहे.  त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची चर्चा मागे रंगली होती. त्यामुळे कुटेच नक्की नसल्याने जिल्ह्यातील अन्य २ भाजपा आमदारांना संधी मिळणे जवळपास  नाही. शिंदे गटात तुफानी स्पर्धा असल्याने जिल्ह्यातील दोन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता नाही असेच चित्र आहे.