सुखद वार्ता!भावी जिल्हा परिषद सदस्यांना आरक्षण सोडतीस हजर राहण्याची मुभा!! २ सत्रात निघणार जिप-पंस चे आरक्षण..!
Jul 6, 2022, 20:22 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाचा मुहूर्त झाल्याने इच्छुक सदस्यांच्या 'दिलकी धडकन तेज' झाली आहे. आरक्षणाचे फासे अनुकूल ठरतात की आरक्षण अडचणरुपी फास ठरतो या धास्तीने शेकडो भावी सदस्य धास्तावले आहे. मात्र त्यांच्यासाठी तूर्तास एक खुशखबर ही आहे की त्यांना आपापल्या मतदारसंघाच्या आरक्षण सोडतीस हजर राहता येणार आहे. दुसरी खबर ही की हे आरक्षण २ सत्रात काढण्यात येणार आहे. यामुळे अनेकांना दोन्ही सोडतीना हजर राहणे शक्य होणार आहे.
जिल्हापरिषद च्या ६८ जागासाठीची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात येईल. १३ तारखेला सकाळी ११ वाजता या सोडतीला प्रारंभ होणार आहे. याशिवाय पंचायत समित्यांचे आरक्षण संबधीत तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. १३ ठिकाणचे आरक्षण २ सत्रात काढण्याचे नियोजन आहे.
बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर, खामगाव, जळगाव, मलकापूर व मोताळा पंचायत समित्यांचे आरक्षण १३ जुलैला सकाळी ११ वाजता ठरणार आहे. चिखली, लोणार, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, सिंदखेड राजा समितीची सोडत प्रक्रिया दुपारी ३ वाजता सुरू होईल.