GROUND REPORT! भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी संतनगरी सजली; जाहीर सभेला राहुल गांधी करणार संबोधित; ५ लाखांच्यावर नागरिकांची गर्दी अन् १९ एकराचे मैदान!  वाचा कसे आहे नियोजन..

 
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते पाटील; बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने सध्या लगतच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या यात्रेला जनसामान्यांच्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान १८ नोव्हेंबरला ही यात्रा संतनगरी शेगावात दाखल होणार असून इथेच एक भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेला खा.राहुल गांधी संबोधित करणार असून सभास्थळाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या सभेला ५ लाखांपेक्षा जास्त नागरिक गर्दी करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे तालुका,जिल्हा, प्रदेश स्थरावरील सर्वच कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे गेल्या २० दिवसांपासून शेगावात तळ ठोकून आहेत. याशिवाय खा.मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्क मंत्री यशोमती ठाकूर यासुद्धा नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.

 अकोला जिल्ह्यातील बाळापूर मार्गे ही यात्रा शेगावात दाखल होईल. १८ नोव्हेंबरला दुपारचे जेवण वरखेड बुद्रुक येथे होईल. त्याच ठिकाणी वारकऱ्यांकडून भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतः खा.राहुल गांधी या रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दुपारी ४ च्या सुमारास ही यात्रा शेगावात दाखल होईल.बाळापूर मार्गावरील स्काय वॉक जवळील शेतात जाहीर सभा होईल. सभेपूर्वी खा. राहुल गांधी हे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातील. रात्री शेगावात मुक्कामी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला यात्रा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे.

 भव्य नियोजन..

दरम्यान या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आमदार राजेश एकडे,  काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, राम विजय बुरुंगले, स्वाती वाकेकर, जयश्रीताई शेळके, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, शेगाव शहर अध्यक्ष  किरणबापु देशमुख , डॉ. जयवंतराव खेडेकर यांच्यासह, जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे.
शेगावात होणारी ही सभा महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा असणार आहे. ५ लाखांच्यावर ही सभा होणार असल्याने तब्बल १९ एकर जमिनीवर या सभेची तयारी सुरू आहे. सभेनंतर खा. राहुल गांधी शेगावातील स्व. गजानन दादा पाटील मार्केट यार्ड येथील मैदानात मुक्काम करणार आहेत.