बुलडाण्याच्या माजी खासदारांची घरवापसी! मनसेच्या माजी तालुकाध्यक्षासह भाजपात प्रवेश; मुकुल वासनिकांचा केला होता पराभव

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोकसभेच्या बुलडाणा मतदारसंघाचे माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे यांनी आज, २५ मार्च रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश कार्यालयात संध्याकाळी सातला हा सोहळा झाला. या वेळी मनसेचे सिंदखेडराजा माजी तालुकाध्यक्ष राजू मांटे यांनीसुद्धा भाजपात प्रवेश घेतला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची उपस्थिती होती.

१९८९ च्या नवव्या लोकसभेत सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहागीरचे सुखदेव नंदाजी काळे भाजपच्या तिकिटावर खासदार झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिकांचा पराभव केला होता. काळे यांना २ लाख ९७ हजार ८९४ तर वासनिक यांना २ लाख ३१ हजार ९९० इतकी मते मिळाली होती. बंद करा बापलेकांचे चाळे, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे ही घोषणा त्यावेळी भाजपच्या प्रचाराचा मुख्य भाग होती.

भाजपला तेव्हा देशभरात ८९ जागांवर यश मिळाले होते. खासदारकी उपभोगल्यानंतर काळे यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना त्यानंतर एकदाही निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. त्यांच्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकीय विजनवासात होते. शेती आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. दरम्यान आज मोठ्या प्रदीर्घ कालावधीनंतर काळे यांनी भाजपात प्रवेश करत घरवापसी केली.