पुन्हा पंचतारांकित खेळ! भाजपचे आमदार ' ताज' ; राष्ट्रवादीचे ट्रायडन मध्ये !! निकालानंतर ' सिल्व्हर ओक ' ला बैठक? अजितदादा पक्षासाठी रीचेबलच: सूत्रांची माहिती

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा); राज्यातील सत्ता संघर्ष टोकाला गेला असून सुप्रिम कोर्टात लढा सुरू असतांनाच राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा मुहूर्त ठरवून दिलाय! यामुळे सर्व पक्षाच्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले असून बहुतेक जन राजधानीत दाखल झाले आहे.

मंगळवारी कोअर कमिटीची बैठक पार पडल्यावर आणि राज्यपालांची भेट घेतल्यावर सत्ता नजरेत आलेल्या भाजपाने सर्व आमदारांना मुंबईत दाखल आज बुधवारी होण्याचे आदेश दिले. माजी ( भावी? ) मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार ( भावी मंत्री?) संजय कुटे हे सेनेच्या बंडखोर आमदारांच्या सोबतच गुवाहाटीवरून उद्या सकाळी मुंबईत पोहचतील. उर्वरित दोन आमदार आकाश फुंडकर व श्वेता महाले  यांनी देखील पक्षादेशाचे पालन करीत मुबंई गाठली.  'ताज पोशी' अर्थात राज्याभिषेक च्या तयारीत असलेल्या भाजपाच्या आमदारांची व्यवस्था ' ताज' हॉटेल मध्ये करण्यात आली आहे. 

 दुसरीकडे  अधून मधून संशयाच्या  घेऱ्यात येणाऱ्या राष्टवादीच्या आमदारांसाठी हॉटेल ट्रायडन सज्ज आहे. काही तासापूर्वी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन नॉट रीचेबल येत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी नेहमीचा  फोन बंद ठेवला असला तरी अन्य मोबाईल च्या माध्यमाने ते पक्ष नेते व आमदारांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सेनेच्या फ्लोअर टेस्ट संदर्भातील अपील वरील आजच्या सुप्रिम सुनावणी नंतर  राष्टावादी ची महत्वपूर्ण बैठक खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी लावण्यात आल्याचेही या सूत्रांनी सांगितले.