अखेर व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर खासदार जाधवांचेही व्हिडिओ उत्तर!; म्हणाले "तशी" डोणगावात चर्चा"! 

आधीच्या निवडणुकीत सावजींनी काय केलं?  हनुमानाचा शेंदूर, कुराणाची अन् बाबासाहेबांची शपथ अन् भारलेल्या तांदुळाचा किस्सा!
 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कालपासून एकच खळबळ उडाली. डोणगावात एका कार्यकर्त्याच्या घरी शिरखुरमा सांगताना रंगलेल्या गप्पात

डोणगावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असतांना सेनेचा सरपंच कसा झाला हे खासदार जाधव यांनी सांगितले. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी ४ लाख रुपये घेऊन एक माणूस दिला अन् त्यामुळेच शिवसेनेचा सरपंच होऊ शकला असे विधान त्यांनी केले. या गप्पांचा कुणीतरी गुपचूप व्हिडिओ काढला अन् व्हायरल केला. त्यानंतर डोणगावातील राजकारण चांगलेच गरम झाले..खासदार जाधव खोटारडे असल्याचा आरोप करून त्यांनी विठ्ठलाच्या डोक्यावर हात ठेवून ते विधान करावे असे चॅलेंज सावजींनी दिले..

आज सावजींनी विठ्ठल मंदिरात जाऊन खासदार जाधवांची वाट पाहिली..मात्र विठ्ठलाच्या डोक्यावर हात ठेवायला खासदार पोहचले नाहीत..अखेर प्रकरण तापत असल्याचे पाहून खासदार जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यांचे म्हणणे मांडले..मी बोललो तशी डोणगावच्या राजकारण चर्चा होती असे म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी एकप्रकारे घुमजाव केल्याचे आता बोलल्या जात आहे. मात्र असे करतांना त्यांनी माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यावर आरोप करण्याची संधी सोडली नाही.
   
 डोणगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. याआधी सुद्धा सुबोध सावजी यांच्याकडे ९ तर शिवसेनेचे ८ सदस्य अशी वेळ आली होती. तेव्हाही सावजी यांचा सरपंचपदाचा उमेदवार पडला होता. मात्र तेव्हा सावजी  कुणी दगाफटका केला हे ओळखण्यासाठी हिंदू सदस्यांना हनुमानाचा शेंदूर काढायला लावला, मुस्लिम सदस्यांना कुराणाची शपथ घ्यायला लावली.

दलीत सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घ्यायला लावली. सदस्यांना भारलेले तांदूळ चारले मात्र यावेळी सावजी यांनी कोणतीही खात्री केली नाही. यावेळी सावजी यांच्याकडे ४ व आखाडे गटाकडे ५ असे एकूण ९ सदस्य असतांना त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पडला. मात्र यावेळी सावजी यांनी कुणाला शेंदूर काढायला लावला नाही,कुराणाची शपथ दिली नाही व भारलेले तांदूळ चारलेले नाही.उलट उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सावजी गटाचा माणूस ९ मते घेऊन निवडून आला. त्यामुळे आखाडे आणि सावजी गटाचे पिढीजात राजकीय वैर असल्याने सावजींनी आखाडे गटाचा सरपंच होऊ दिला नाही अशी चर्चा डोणगावात सुरू असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र मी तसे बोलत असतांना कुणीतरी व्हिडिओ काढला अन् व्हायरल केला असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.