खरिपाच्या धामधुमीत पार पडणार ग्रामपंचायतींच्या लढती ! निवडणुकीवर ओबीसी आरक्षणाचे सावट!!  ८० जागांसाठी घमासान; उद्यापासून नामांकन 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी;बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार हाय! मृगनक्षत्राच्या तोंडावर म्हणजे ५ जूनला यासाठी मतदान होत असून उद्या १३ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 
 

सध्या जिल्ह्यातील तापमानाने कळस गाठला असून या निवडणुकांनी ग्रामीण भागातील राजकारण देखील तापले आहे. विविध कारणामुळे रिक्त असलेल्या  ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी हा  निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी तो ओबीसींच्या जागा वगळून घोषित करण्यात आला आहे.

 ६३ ग्रामपंचायत च्या ८० जागांसाठी ५ जूनला निवडणूक होऊ घातली आहे. १३ ते २० मे दरम्यान ( अर्थात सुट्टीचे दिवस वगळून)  सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान अर्ज सादर करता येणार आहे. २३ तारखेला अर्जांची छाननी करण्यात येणार असून २५ ला दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना माघार घेता येईल. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याने २५ ही तारीख महत्वाची ठरली आहे. यानंतर रणरणत्या उन्हात प्रचाराचा धुरवळा उडणार आहे. 

६जूनला निकाल

दरम्यान पोटनिवडणूक असली तरी ग्रामीण भागातील राजकारण व ग्रामपंचायतची  अजूनही कायम असलेली क्रेज लक्षात घेता चुरशीच्या लढती रंगणार असा रागरंग आहे.  ५ जूनला सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेदरम्यान मतदान पार पडल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी ६ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. रोहिणी व मृग नक्षत्राची जोड आणि खरीप हंगाम पूर्व तयारीची धूम या पार्श्वभूमीवर पार पडणाऱ्या या अस्सल ग्रामीण बाजाच्या लढती चांगल्याच रंगतील हे उघड आहे.