जिल्ह्यातला शेतकरी वाऱ्यावर सोडला..! पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे फोनवरूनच हाय हॅलो..! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्त हाक, जिल्ह्यात कधी येता हो साहेब..?

 
बुलडाणा( अनंता काशीकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात परतीच्या पावसाने बळीराजाला अक्षरश: झोडपून काढले. उभ्या सोयाबीनला कोंब फुटले. अनेक शेतात अजूनही गुडघाभर पाणी आहे.त्यामुळे सोयाबीन सोंगता येत नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, मात्र अजूनही पंचनामे नाही.मदतीचे ठोस आश्वासन नाही. तेही जाऊद्या मात्र बळीराजाच्या पाठीवर हात ठेवून आधार देण्याची गरज असताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा पत्ता नाही.

 गुलाबराव पाटील बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन आता महिना उलटून गेलाय. महिनाभराआधी ते एकदा जिल्ह्यात आले खरे मात्र साधे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचा परिचय करून घेण्यापुरता वेळ देखील त्यांना मिळाला नाही. त्या दिवशी ते आले, मेहकर आणि जळगाव जामोद येथील सभांना संबोधित करतांना शेरीशायरी केली, विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला, टाळ्या मिळवल्या आणि त्याच दिवशी जिल्ह्यातून निघून गेले. पालकमंत्री आले अन् राजकारण करून गेले असेच त्यांच्या त्या एकदिवसीय दौऱ्याचे वर्णन करता येईल. 
    
 पालकमंत्र्यांच्या त्या दौऱ्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. चिखलीचे तहसीलदार तर अतिवृष्टी झाली हे मान्य करायलाच तयार नव्हते. अतिवृष्टीच झाली नाही त्यामुळे पंचनाम्याची गरज नाही अशी भाषा वापरण्यापर्यंत काही अधिकाऱ्यांची मजल गेली. आमदार श्वेताताई, रविकांत तुपकर यांच्यासारख्या जिल्ह्यातील नेत्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र बेपत्ता होते. राष्ट्रवादी काँग्रेसने तर चक्क पालकमंत्री गायब झाल्याची तक्रार दिली मात्र तरीही आजपर्यंत पालकमंत्री सापडले नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना फोनवरून हाय हॅलो करत असतीलही मात्र साहेब जिल्ह्यात कधी येता हो अशी आर्त हाक संकटग्रस्त शेतकरी पालकमंत्र्यांना मारत आहेत..!