चिखली विधानसभा मतदारसंघात ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका! बाजी कोण मारणार? ताई की भाऊ...?
जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून चिखलीकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागून असतात. कडाक्याची थंडी, पावसाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूत इथले राजकारण कायम तापलेले असते. आमदार श्वेताताई आणि माजी आमदार राहुल बोंद्रे आपापली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते करीत असताना साम, दाम,दंड ,भेद या सगळ्या बाबींचा वापर दोन्ही बाजूंनी होत असल्याचे मतदारसंघातील जनतेने अनुभवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल बोंद्रेंचा पराभव करून आमदार झाल्यानंतर श्वेताताईंनी मतदारसंघ पिंजून काढला.
सध्याही गावागावात विविध विकासकामांच्या भूमिपूजनचा तडाखा त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत त्यांची मतदारसंघातील पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे राहुल बोंद्रे जिल्हाभर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी फिरत आहे. चिखली तालुक्यात सुद्धा पक्षसंघटन मजबूत करण्यावर त्यांचा विशेष जोर आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. या निवडणुकांत ताई बाजी मारणार की भाऊ हे लवकरच स्पष्ट होणार आहे.