या कारणामुळे जुनी पेन्शन संघटनेचे ३ हजार कर्मचारी होणार भारत जोडो यात्रेत सहभागी! राज्यकोषाध्यक्ष मुरली टेकाळे काय म्हणाले वाचा..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राजस्थान आणि छत्तीसगड या काँग्रेसशाशित राज्यात तेथील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसनेते खा. राहुल गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी व महाराष्ट्रात सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निवेदन करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या बुलडाणा शाखेचे ३ हजार कर्मचारी आज, १८ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.  संघटनेचे कोषाध्यक्ष मुरली टेकाळे यांनी तशी माहिती दिली आहे.

 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी लढा सुरू आहे. एकामागून एक राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा निर्णय होत असताना पुरोगामी महाराष्ट्रात मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. देशात सध्या पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

 महाराष्ट्रात मात्र शेअर मार्केट वर आधारित एनपीएस योजना लागू आहे. यात कर्मचाऱ्यांना तुटपुंजा लाभ मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. येणाऱ्या काळात जो पक्ष जुनी पेन्शनची मागणी मान्य करेल त्यालाच समर्थन देण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे मुरली टेकाळे यांनी म्हटले आहे. एकजूट व ताकद दाखवण्यासाठी खा. राहुल गांधींच्या शेगाव येथील सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन संघटनेचे राज्याचे नेते मुरली टेकाळे व जिल्हाध्यक्ष नंदू सुसर यांनी केले आहे.