दिल्ली डायरी: ५
राजकीय धामधुमीतही अमित शहांनी 'सहकार'च्या अधिवेशनास लावली हजेरी! दुय्यम वागणूक नाही पण चुकांची पाठराखणही नाही!!  म्हणाले, जुन्यानी आता नव्याना संधी द्यावी..

जिल्ह्यातल्या "या" मातब्बरांचा सहभाग!
 
नवी दिल्ली ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
 राजकीय घडामोडी, अग्निपथ विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह आंदोलन, राष्ट्रपती पदाची निवडणुकीची धामधूम आणि यावर कळस म्हणजे महाराष्ट्रामधील महा बंडाळी व संभाव्य सत्ताबदल असे राजकारणाचे चक्री वादळ घोंघावत असताना अन प्रचंड व्यस्ततेत देखील  भाजपचे हेविवेट नेते तथा  केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शाह यांनी २३ जूनला सहकार विषयक परिषद वजा अधिवेशनाला हजेरी लावीत शॉर्ट बट स्वीट धर्तीवरील परंतु रोखठोक मार्गदर्शन केले.

 मल्टिस्टेट अँड शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि कोऑपरेटीव्ह सोसायटींचे राष्ट्रीय अधिवेशन २३ जून रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडले. नियमित कामांचा बोजा अन राजकारणामुळे प्रचंड बिझी असल्याने त्यांनी सकाळी ११ ते १२.३० वाजेदरम्यान अशी दीडेक तासच हजेरी लावली. पण ' ते आले, त्यांनी पाहिले, ते बोलले अन त्यांनी जिंकले असाच त्यांचा वावर होता.  'NAFCUB' आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने आयोजित या एकदिवसीय अधिवेशनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. १०० वर्षे पूर्ण झालेल्या सहकारी बँकांचा यावेळी सन्मान करण्यात आला."सहकारातून समृद्धी' या नाऱ्यानुसार झालेल्या कार्यक्रमात सत्कार, सन्मान आणि पुढील १०० वर्षांचे व्हिजन यासंदर्भात चर्चा झाली. आपल्या मनोगतातून त्यांनी  सहकार क्षेत्राला आश्वस्त करतानाच प्रस्थापितांना दम देखील भरला. ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर 'सहकार' सर्वव्यापी अन सर्वसमावेशक असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून केंद्राकडून सहकाराला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र चुकीच्या कामाची पाठराखणही केली जाणार नसल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.  सहकाराला मोठी परंपरा असली तरी जुन्या मंडळींनी आता नव्या लोकांना संधी दिली पाहिजे, असे  रोखठोक प्रतिपादन त्यांनी केले. 


बँकांनी Acount, Audit, Service यासह इतर सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला. भविष्यातील आव्हाने, टॅक्स, सहकार कायदा आणि बऱ्याच महत्वाच्या विषयांवर या अधिवेशनात साधकबाधक चर्चा झाली. समारोपीय कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती. डॉ. कराड यांनी सहकार व अर्थमंत्रालय यामध्ये समन्वय ठेऊन चांगले निर्णय घेतले जातील, असा विश्वास दिला.  महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे काकासाहेब कोयटे, बुलडाणा अर्बनचे डॉ. सुकेश झंवर, गोदावरी अर्बनचे धनंजय तांबेकर, अरिहंत मल्टि स्टेटचे जितेंद्र जैन, शाहू मल्टिस्टेटचे संदीप शेळके,  नितीन उबाळे यावेळी हजर होते.
 
उर्जामय अधिवेशन

या कार्यक्रमास बुलडाणा जिल्ह्यातून सुकेश झंवर, जितेंद्र जैन, संदीप शेळके हे सहकारातील चमकणारे  तारे सहभागी झाले. हा कार्यक्रम सहकाराला ऊर्जा देणारा ठरला अशी प्रतिक्रिया जैन व शेळके यांनी बुलडाणा लाईव्ह सोबत बोलताना यांनी दिली. सहकार क्षेत्रातील मातब्बर मंडळी सोबत सहभागी होण्याचा आनंद अविस्मरणीय ठरला असे त्यांनी  सांगितले.