ठरल! १० जणांनी घेतली माघार!अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात! भाजपच्या रणजित पाटलांना टक्कर द्यायला बुलडाण्याचे धीरज लिंगाडे महाविकास आघाडीकडून तर प्रा. अनिल अंमलकार वंचितचे उमेदवार!
वंचितचा उमेदवार जिंकण्यासाठी नाही तर महाविकास आघाडीचे मते खाण्यासाठी उभा असल्याचा आरोप
बुलडाण्याच्या धीरज लिंगाडे यांनी दोन वर्षे आधीपासून या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. हजारो पदवीधरांची नोंदणी त्यांनी पाचही जिल्ह्यात करून घेतली होती. मात्र जागावाटपात जागा काँग्रेसला सुटली तेव्हा काँग्रेसलाही या मतदारसंघात प्रभावी उमेदवार सापडेना, त्यामुळे शिवसेनेच्या धीरज लिंगाडे यांना काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच वंचितने प्रा.अनिल अंमलकार यांना उमेदवारी घोषित केली. अंमलकार हेसुद्धा आधी शिवसेनेचे पदाधिकारी होते, वंचितची उमेदवारी घेण्यापूर्वी त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून झाला. यासोबतच वंचितचा उमेदवार हा भाजपच्या बळावर महाविकास आघाडीचे मते खाण्यासाठी उभा असल्याचेही महाविकास आघाडीचे नेते बोलू लागले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ४९७ मतदार...
या निवडणुकीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३६ हजार ४९७ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे आणि वंचितचे प्रा.अनिल अंमलकार बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात पडावी यासाठी दोन्ही उमेदवार जोर लावताना दिसतील. जिल्ह्यात भाजपचे ३ आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे २ आमदार आहेत, त्यामुळे हे ५ आमदार मिळून भाजपच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावी यासाठी प्रयत्न करतांना दिसणार आहेत.