बुलडाणा लाइव्हचे भाकीत खरे ठरले! राहुल बोंद्रे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू..! वाचा कुणी दिला पहिला राजीनामा..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पक्षाचा नियम पुढे करून जिल्हाध्यक्षपदाचा  राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राहुल बोंद्रे यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तिनिष्ठ गटाने राहुल बोंद्रे यांच्या राजीनाम्यावर नाराजी दर्शवली आहे तर पक्षनिष्ठ गटाने या राजीनाम्याचे स्वागत केले आहे.."भाऊ तुम्ही नाही तर आम्ही कुणीच नाही" अशी भूमिका व्यक्तिनिष्ठ गटाने घेतल्याने राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देऊ शकतात अशी शक्यता बुलडाणा लाइव्हने आज सकाळीच वर्तविली होती, ती तंतोतंत खरी ठरली आहे. चिखली तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी राजीनामा देऊन राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

ऐन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कुशल संघटक असलेले राहुल बोंद्रे यांचा राजीनामा पक्षासाठी हानिकारक ठरणारा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाची गरज आहे. दोन वर्षे आधीपासून राहुल बोंद्रे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्ष संघटना त्यांनी व्यापक केली आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नव्या व्यक्तीवर ही जबाबदारी टाकने उचित होणार नाही. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल बोंद्रे यांचा राजीनामा नामंजूर करावा अशी मागणी चिखली तालुका विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष गोपाल म्हस्के पाटील यांनी केली आहे. राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ त्यांनी राजीनामा दिला असून विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाकडे राजीनामा पाठवला आहे..