Breaking! सुप्रिम कोर्ट  आयोगाला म्हणाले...जिल्हा निहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम ठरवा! झेडपी, पालिका निवडणुकांवर झाली सुनावणी

 
बुलडाणा( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्हा निहाय आढावा घेऊन   जिल्हापरिषद व पालिका निवडणुकांचा कार्यक्रम ठरवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज, १७ मे रोजी दिले. जिथे पाऊस कमी पडतो तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत काय? असा सवालही न्यायालयाने आयोगाला केला.

 राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका व नगरपरिषदा निवडणूक संदर्भात आज,१७  मे रोजी  दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाच्या वतीने पावसाळ्यात निवडणूका घेण्यात काय अडचणी आहेत, ते स्पष्ट करण्यात आले. यावर न्यायाधीशांनी  आयोगाला, जिल्हानिहाय  पाऊस व अन्य विषयक आढावा घेण्याचे निर्देश दिले.तसेच ज्या जिल्ह्यात कमी पाऊस पडतो तिथे निवडणूक घेण्यास काय हरकत आहे ? असा सवालही केला. निवडणूक पूर्व तयारीची प्रक्रिया खंडित होऊ नये यावर कोर्टाचा भर असल्याचे दिसून आले. या आढाव्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आली नसली तरी आता आयोगाने आढावा घेतल्यावरच चित्र स्पष्ट होईल असे चित्र आहे. 

आणि ... बुलडाण्याचं

 यापूर्वी सुप्रिम कोर्टाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशात आयोगाला २ आठवड्यात निवडणूक कार्यक्रम लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार  नगरपालिका व जिल्हा परिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम नव्याने सुरू करण्यात आला. याने आता वेग घेतला आहे.  बुलडाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास , जिल्हा परिषदेच्या ६८ गट आणि १३ पंचायत समितीच्या १३६ गणाच्या प्रभाग रचनेवर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे.  २३ मे पर्यंत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे रचनेचा प्रस्ताव  सादर करणार आहे. दुसरीकडे  जिल्ह्यातील ८ पालिका च्या प्रभाग रचनेचे कामही वेगात सुरू आहे.