चिखली तालुक्यात काँग्रेसमध्ये मोठी फुट! गावोगावच्या काँग्रेस सरपंच, उपरपंचांचा आमदार श्वेताताईंवर विश्वास; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या हस्ते भाजपात प्रवेश;
करणखेडचे सरपंच म्हणाले,आमच्या तीन पिढ्या काँग्रेससाठी खपल्या, पण माजी आमदाराने...
आतापर्यंत जे जे अशक्य वाटत होते ते ते शक्य करून दाखवण्याचे काम भाजपने केले असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. भाजपकडे जनहित आणि लोकोपयोगी कामे करण्याची दृष्टी असल्याने लोकांचा भाजपवरील विश्वास वाढत असल्याचेही ते म्हणाले. तर भाजपा हा सुसंस्कृत पक्ष असून कोणत्याही प्रकारचा जातीभेद आम्हाला मान्य नाही. समरस समाज निर्मितीसाठी काम करणारा हा पक्ष आहे. "सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना, पथ का अंतिम लक्ष नही हैं सिहांसन चढते जाना" हा भाजपचा संस्कार असल्याचे आमदार श्वेताताई महाले यावेळी म्हणाल्या. केंद्रात मोदीजी,अमित शहाजी, जे पी नड्डाजी आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुशल नेतृत्वात केंद्र आणि राज्य प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक सरपंचांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपात मान, पान, सन्मान आणि विकास कामेही मिळेल असा शब्द यावेळी आमदार श्वेताताईंनी दिला.
काँग्रेससाठी आमच्या तीन पिढ्या खपल्या पण..
माझे आजोबा काँग्रेसचे, वडील काँग्रेसचे, आमचे अख्खे घराणे काँग्रेसचे. काँग्रेससाठी आमच्या घराच्या तीन पिढ्या खपल्या पण काँग्रेसने आणि काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मतदार संघाचा विकास केला नाही. माजी आमदाराने काहीच केले नाही, आमच्या गावचा कोणताच विकास केला नाही. मात्र आमदार श्वेताताईंनी ज्या पद्धतीचा विकासाचा झंझावात मतदारसंघात आणला तो पाहता आमच्या तीन पिढ्या काँगेसच्या असल्या तरी भाजपात प्रवेश घेत असल्याचे करणखेडचे सरपंच गजानन गायकवाड यावेळी म्हणाले.
एकलारा गावच्या सरपंच सौ. संगीता पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. एकलारा सरपंच सौ.संगीता पवार, शेलोडी सरपंच समाधान रेठे, करणखेड सरपंच गजानन गायकवाड, शिंदी हराळी सरपंच प्रमोद सपकाळ, डोंगरगाव माजी सरपंच पांडुरंग दांदडे, रामेश्वर दांदडे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल दांदडे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्राम पंचायत सदस्य संगीता पवार, कुंदन पवार, श्वेता तोंडे, अशोक तोंडे, सोसायटी संचालक वासुदेव गावंडे, सोसायटी संचालक वसंत गावंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश आटोळे, प्रकाश खेडेकर , भास्कर दांदडे, समाधान धुमाळ, अरुण पाटील यांनीही प्रवेश केला.