Big Breaking राहुल बोंद्रेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील पदाचा राजीनामा!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असताना आता आणखी एक राजीनामा समोर आला आहे. बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात ठरलेल्या एका व्यक्तीने एका पदावर पाच वर्षापेक्षा जास्त काळ राहू नये  या नियमाप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधी  काँग्रेसमध्ये अखिल भारतीय स्तरावर वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.

दिल्लीत जास्त लक्ष दिल्याचा फटका त्यांना गल्लीत ( बुलडाणा विधानसभेच्या निवडणुकीत) बसला होता. त्यानंतरही हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पंजाबच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच वेळी त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव देखील करण्यात आले होते. दरम्यान राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या   उपाध्यक्ष पदाचा १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र असे असले तरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पद त्यांच्याकडे कायम आहे.