Big Breaking! बुलडाण्याच्या दोन्ही आमदारांचा शोध लागला..! पीए अन् बॉडीगार्डलाही ठेवले दूर..?
Jun 21, 2022, 10:44 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे पाचपैकी पाच आमदार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. काल, संध्याकाळपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. ते गुजरातच्या सुरत मधील एका हॉटेल मध्ये असल्याची माहिती असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार सुद्धा आहेत. दरम्यान बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि महकरचे आमदार संजय रायमुलकर यांचा फोनही बंद येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आत्ता हाती आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार दोन आमदारांपैकी एका आमदाराचे अंगरक्षक सुरतमध्ये असल्याची माहिती समोर आल्याने आमदार सुरतमध्येच असण्याची शक्यता आहे.
मात्र असे असले तरी सध्या अंगरक्षक आणि स्विय सहायकांना सुद्धा बाजूला ठेवण्यात आल्याचे कळते. गोपनीय चर्चा बाहेर जाऊ नये म्हणून आमदारांकडून ही सगळी खबरदारी घेण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. त्यामुळे दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला काही आमदार गैरहजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यांचा पूर्वनियोजित नाशिकचा दौरा रद्द करून दिल्लीला गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.