Big Breaking! आठवड्यानंतर "हॉटेलात" थांबलेले आमदार मतदारसंघात परतले ! खंडीत जनसंपर्क पुन्हा सुरळीत!!
Updated: Jun 25, 2022, 20:54 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शिंदेंसेनेची महाबंडाळी , राज्यातील अस्थिर सरकार आणि वेगवान राजकीय घडामोडी यामुळे राजधानी मुंबईत व काही काळ संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मलकापूरचे काँग्रेसचे आमदार राजेश एकडे अखेर आज शनिवारी मतदारसंघात परतले! आज संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्ते व गावकऱ्यांशी संपर्क साधला.
वर्षातील सर्वात मोठा दिवस अर्थात २१ जून हा राज्याच्या राजकीय महा भूकंपाला जन्म देणारा ठरला! याचे पडसाद मुंबईच नव्हे राज्यासह सुरत, गुवाहाटी अन दिल्ली पर्यंत पोहोचले. त्यापूर्वी विधान परिषद ची निवडणूक देखील वादळी ठरली. यामुळे आमदार एकडे हे मागील १८ जूनपासून मुंबईत अडकले. भाजपाचे मनसुबे लक्षात घेता मध्यंतरी काँग्रेसच्या ४४ आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या निर्णयाप्रत हाय कमांड आले होते. आमदारांनाना बाळासाहेब थोरात यांच्या ' निगराणी खाली' ठेवण्यात आल्याची चर्चा गरम होती.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अन्य ज्येष्ठांची अनुमती घेऊनच आमदार एकडे आज, २५ जूनला सकाळी नांदुरा येथे पोहोचले. यानंतर नांदुरा व दुपार नंतर त्यांनी मलकापूर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या.