जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचा पचका होण्याची शक्यता! ५ लाखांचा आकडा केवळ फुगाच; सभास्थळी ४८ हजार खुर्च्या, त्यातही भाड्याने आणावी लागणार माणसे! 

अंतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर! आयोजकांचे पितळ उघडे..!

 
शेगाव( कृष्णा सपकाळ: ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  म्हणे, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला ५ लाख लोकांपेक्षा जास्त गर्दी जमणार, पण तस काही नाही.  सभेला जमणाऱ्या सगळ्यांसाठी खुर्च्या असणार असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आंल, मात्र आता या खुर्च्यांनीच आयोजकांच पितळ उघडं पाडलय. ज्या मैदानात राहुल गांधींची सभा होणार आहे,त्या मैदानात आज, १७ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत केवळ ४८ हजार खुर्च्या टाकण्यात आल्याचे ' बुलडाणा लाइव्ह" च्या पाहणीत समोर आलंय. एवढ्या खुर्च्यात परिसराची क्षमता आटोपली असून त्यात आणखी ५ हजार खुर्च्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळेच ५ लाखांची गर्दी जमणार असल्याचा फुगा आत्ताच फुटला असून उद्या या यात्रेचा पचकाच होण्याची जास्त शक्यता आहे.

खा. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उद्या शेगावात आहे. महिनाभरापासून प्रदेश अन जिल्हा पातळीवरील नेते त्याची तयारी करीत आहेत.( यात्रेच्या तयारीत बिझी असल्याचे दाखवत आहे.) काँग्रेसचा केवळ एक आमदार असलेल्या जिल्ह्यात ही सभा होणार असली तरी ५ लाखापेंक्षा जास्त लोक सभेला जमणार असल्याचा दावा जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केला. मात्र प्रत्यक्षात सभास्थळी केवळ ४८ हजार खुर्च्या आहेत. मैदानाची क्षमता पाहता त्यात आणखी ५ हजार खुर्च्यांची वाढ होऊ शकते. असे झाले तरी तो आकडा ५५ हजारांच्या वर जात नाही. त्यामुळे ५ लाखांचा आकडा केवळ फुगाच आहे. उद्या प्रत्यक्ष सभेच्या वेळी यातील काही खुर्च्याही रिकाम्या राहणार असल्याने चांगलाच पचका होण्याची शक्यता आहे.
   
 समन्वयाचा अभाव..

दरम्यान यात्रेचे नाव भारत जोडो असले तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा चांगलाच अभाव असल्याचे दिसत आहे. प्रत्येक जबाबदार नेत्याकडून नियोजनाची वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने खरे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात  बॅनर आणि पोस्टर वगळता जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा झाले नाहीत. गावागावात केवळ विशिष्ट नेत्यांना गाड्या घेऊन येण्याचे फर्मान दिले असून "त्या" गाड्यांचे भाडे सुद्धा मिळणार असल्याने लोक "स्वयंस्फूर्तीने" सहभागी होत असल्याचा काँग्रेसचा दावाही फोल ठरणार आहे. ज्यांना येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे तिकीट पाहिजे अशा इच्छुकांना सुद्धा गाड्या भरून आणण्याचे फर्मान नेत्यांकडून दिल्या गेले आहे. प्रत्येक जण आपापल्या पातळीवर श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याने काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे, या गटबाजीमुळे शेगावात उद्या या यात्रेचा पचका उडण्याची चिन्हे आहेत.