BULDANA LIVE SPECIAL 'सुप्रिम' आदेश! निवडणूक आयोग लागले तयारीला ; यंत्रणांना लावले  कामाला!! जिल्ह्याची चमू मुंबईला रवाना

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सुप्रिम कोर्टाने  राज्य सरकारला दे धक्का देत  दिलेल्या रोखठोक आदेशाला गंभीरतेने घेत राज्य निवडणूक आयोग  जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वतयारीला लागलंय! एवढंच नव्हे तर त्यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाला देखील  तात्काळ कामाला लावलंय! यापरिणामी यंत्रणा खडबडून जागी झाल्या असून जिल्ह्याचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.

बुलेट ट्रेनच्या गतीला लाजवेल इतक्या गतीने  गत दोनेक दिवसात प्रसाशकीय हालचाली, वेगवान घडामोडी झाल्या.  विशेष विधेयकाद्वारे  आपल्याकडे निवडणूक घेण्याचे अधिकार घेणाऱ्या राज्य सरकारला सुप्रिम कोर्टाने ४ मे रोजी  दे धक्का दिला ! राज्य आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले.

 यामुळे ऍक्टिव्ह मोडवर आलेल्या  आयोगाने  जिल्हा धिकारी व निवडणूक विभागाला तात्काळ  खलिता  धाडला.  १९ मार्च २०२२  रोजीच्या अधिनियम मधील सुधारणा अस्तित्वात येण्यापूर्वी  १० मार्च रोजी असलेली ( तयार करण्यात आलेली) प्रभाग रचना कार्यवाही ज्या टप्प्यावर होती, तेच धरून कार्यवाही सुरू ठेवावी, नकाशे गुगल नकाशावर सुवर इम्पोज करावे आणि  जनगणनेची  आकडेवारी लिंक करावी असे निर्देश आयोगाने दिले.

 तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई स्थित आयोगाच्या कार्यालयात उद्याच ( ७ मे रोजी)  पाचारण केले आहे. त्यामुळे एक अधिकारी व कर्मचारी आज ६ तारखेला मुंबईला रवाना झाले आहे.  ही चमू सोबत कागदपत्रे, जनगणना आकडेवारी, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट, गण यांची गाव निहाय माहिती, नकाशे घेऊन रवाना झाली आहे. यामुळे राज्य सरकार चिंता व चिंतनग्रस्त असताना आयोग आणि यंत्रणा मात्र कामाला भिडल्याचे मजेदार चित्र आहे.