BULDANA LIVE EXCLUSIVE : मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त 'देवेंद्र' वा ' 'नाथांना' च ठावे ! पण निवडीची समीकरणे बदलली हे नक्की; जिल्हावासीयांनो आता  मोठ्या धक्क्याची ठेवा तयारी!!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यातील दोघांचे सरकार अन संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आता काहीसा चेष्टेचा विषय ठरलाय ! यामुळे   आता विस्ताराचा मुहूर्त एकतर डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस वा सीएम एकनाथ शिंदे यांनाच ठाऊक असे मजेदार चित्र आहे. मात्र जेव्हाही होईल तेंव्हाही धक्कातंत्र हा शब्द अटळ असल्याचे मानले जात असून याला  २५ लाख बुलडाणेकर देखील  अपवाद राहणार नाही हे उघड आहे.

 केवळ दोघांचाच समावेश असलेले मंत्री मंडळ आता विरोधकच काय सर्व सामान्य राजकारणप्रेमी पब्लिक साठी देखील  प्रारंभी खमंग चर्चा अन आता चेष्टेचा विषय ठरलाय! प्रसिद्धी माध्यमे   वेळोवेळी मुहूर्त शोधून थकलीय आणि  त्यांची सूत्रे, जाणकार, तज्ञ मंडळी, ओव्हर टाइम करूनबी अचूक मुहूर्त शोधण्यात असफल ठरलीत!  यामुळे केवळ राज्याच्या विकासासाठी एकत्र आलेल्या दोघा महाभागांनाच मुहूर्त  ठाऊक असावा. 

धक्क्यावर धक्के..!

मात्र जेव्हाही हा विस्तार होईल तेंव्हा राज्यासाठीच नव्हे तर  भाजपा- शिंदे गटाचे प्राबल्य असलेल्या  बुलडाणा जिल्ह्यासाठी सुद्धा त्यात धक्क्यावर धक्के बसण्याची दाट शक्यता असल्याचे मानले जात आहे. पहिल्या टप्प्यात मर्यादित ( १० ते १२ असा) मर्यादित विस्तार झाला तर त्यात जिल्ह्याला संधी नसणार हे जवळपास नक्की हाय! दर दिवशी बदलणाऱ्या धक्का दायक राजकारणामुळे आता मंत्री पदाचे निकष व राजकीय स्थिती देखील  बदलली आहे. यापूर्वी आ. संजय कुटे यांची वर्णी ग्यारेंटेड वाटत होती . मात्र आता ' दगड कार' चंद्रकांत पाटील यांचा समावेश नक्की असल्याने नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुटे यांचे नाव आघाडीवर आहे.

यामुळे त्यांच्याच समावेशाची स्थिती ५०-५० अशी झाली आहे.  मात्र अध्यक्ष पदाची चर्चा राजकीय अफवा ठरली तर त्यांचा  लालदिवा (आणि  जिल्ह्याचे पालकत्वही) नक्की आहे. दीर्घ काळ तळ्यात मळ्यात राहिल्यावर शिंदेशाहीत सहभागी झालेले खा. प्रतापराव जाधव यांना केंद्रात लाल दिवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रतापगड मधील आ. संजय रायमूलकर यांची लाल दिव्याची शक्यता मंदावली आहे. यामुळे आपणास मंत्रिपदाचा मोह नसल्याचे  वारंवार सांगणारे आमदार संजय गायकवाड व यासाठी  इच्छुक श्वेता महाले यापैकी कुणाची लॉटरी तर लागणार नाहीना? असा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र बंडाच्या महाभारतात मोठा वाटा असणाऱ्या दोन्ही 'संजय' च्या भाग्याचा फैसला नावाप्रमाणेच  प्रतापी राजकारणी असणाऱ्या खासदारांच्या हाती आहे. आता ते त्यांचे भाग्य उजळविन्याचा फैसला करणार नाही हे उघड रहस्य हाय...