BULDANA LIVE EXCLUSIVE: ६०वर्षांत केवळ जिल्ह्यातील १० नेतेच ठरले लालदिव्याचे मानकरी!  अकरावा कोण ? !!

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यावर झालेल्या निवडणुका हा निकष लावला तर  जिल्ह्याच्या आजवरच्या ६० वर्षांच्या इतिहासात केवळ १० नेत्यांना लालदिव्याच्या गाडीत बसण्याचा मान मिळाला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना  मानाच्या मंत्रिपदाने कायम हुलकावणी दिल्याचे राजकीय चित्र आहे. १८५३ पासून वेगवेगळे अवतार धारण करणारा पौराणिक, ऐतिहासिक अन राजकीय खाणाखुणा अंगावर बाळगणारा बुलडाणा जिल्हा याचा मूक साक्षीदार ठरला आहे...!

आज देश अन राज्याच्या उज्ज्वल संसदीय परंपरेचे राजरोस वस्त्रहरण होत असताना पार ब्रिटीशकालीन इतिहासात डोकावून पाहिले तर भारताचा संसदीय इतिहास उलगडत जातो. १९३५ च्या भारत सरकार कायदा( गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट) हा भारतीय संसदीय इतिहासाचा श्रीगणेशा, संघराज्य शासन पद्धतीची मुहूर्तमेढ ठरली! प्रांताना स्वायत्तता, १० टक्के लोकांना मताधिकार, ही तेंव्हाची वैशिष्ट्ये ठरली. जुलै १९३७ मध्ये विधानसभा अस्तित्वात आल्यावर १९ जुलैला पुणे येथील कौन्सिल हॉल मध्ये पाहिले अधिवेशन पार पडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चे पाहिले अधिवेशन याच देखण्या इमारतीत १० सप्टेंबर १९४७ रोजी भरले होते. राज्यघटना अंमलात आल्यावर १९५२ मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक घेण्यात आली. तेंव्हा बुलडाणा जिल्हा मध्यप्रदेशात समाविष्ट होता. 

  १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर  पहिली निवडणूक ठरली ती १९६२ ची!
 तेंव्हापासून जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघातून अनेक  मातब्बर, मुत्सद्दी नेते आमदार होऊन सभागृहात पोहोचले. पण  आजवरच्या ६०  वर्षांच्या काळात केवळ १० भाग्यवान नेत्यानाच लालदिव्याच्या प्रकाशात न्ह्यायला मिळाले.  मावळत्या मंत्रि मंडळातील राजेंद्र शिंगणे यांना वारंवार हा मान मिळाला. मात्र त्यांच्या पिताश्रीना( स्वर्गीय भास्करराव शिंगणे) यांना मंत्रिपदाची संधी मिळालीच नाही अन आमदारकी एकदाच मिळू शकली. हे एक उदाहरण लालदिवा  मिळणे किती  दुर्मिळ आहे, तो लक्ष्मीसारखा किती चंचल आहे हे सिद्ध करते.
 
लोकसभेतून थेट विधानसभेचे मंत्रिपद!

 जिल्ह्यात या लालदिव्याचा प्रकाश यायला १ तप उजाडावे लागले.  १९७५ मध्ये (स्व) शंकरराव चव्हाण  मुख्यमंत्री असतांना त्यांनी ऍड अर्जुनराव कस्तुरे यांना समाजकल्याण मंत्री केले तेंव्हा ते खासदार होते, अशी माहिती राजकीय अभ्यासकांनी दिली.  ते मग परिषदेतून आमदार झाले. यानंतर  वसंतदादा पाटील व नाशिकराव तिरपुडे यांच्या मंत्रिमंडळात रामभाऊ लिंगाडे हे राज्यमंत्री झाले. पुढे ' पाठीत खंजीर खुपसने' ची घडामोड आणि पुलोद चा प्रयोग झाल्यावर शिवाजीराव पाटील हे पाटबंधारे राज्यमंत्री झाले.  इंदिरा काँग्रेसवर निवडून आल्यावर ते यासाठी विदर्भ काँग्रेस मध्ये गेले होते. (ते जिल्ह्यातील पाहिले बंड ठरावे.) यानंतर सलग संधी मिळालेले भारत बोन्द्रे प्रथम  पाट बंधारे राज्यमंत्री अन नंतर कॅबिनेट मंत्री झाले. नव्वदीच्या दशकात प्रकाशात आलेले सुबोध सावजी यांना मंत्रिपद मिळाले व ते अकोल्याचे पालक मंत्रीही राहिले. सेनेतील  मोठ्या पहिल्या बंडात सहभागी  राजेंद्र गोडे हे गृह खात्याचे उप मंत्री झाले.

त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी व भविष्यातील दिग्गज नेते प्रतापराव जाधव यांना १९९८ मध्ये लाल दिवा मिळाला. आमदारकी व लालदिवा या बाबतीत सर्वाधिक भाग्यविर ठरलेले राजेंद्र शिंगणे हे याबाबतीत विक्रमवीर ठरले !   दुसऱ्यांदा सीएम बनण्याची संधी हुकलेल्या देवेंद्र फडणवीस  यांच्या कार्यकाळात पांडुरंग फुंडकर व संजय कुटे यांना लालदिवा मिळाला. कुटे हे  दहावे मंत्री वीर ठरले. काही दिवसात ते ११ वे मंत्री ठरणार हे जवळपास नक्की आहे. ( उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारखा उच्च त्याग त्यांना करावा लागला तर ती बाब अलहिदा) . आता श्वेताताई महाले, संजय रायमूलकर किंवा संजय गायकवाड हे १२ वे मंत्री ठरतात (की बारावे खेळाडू ठरतात) हा राजकीय उत्सुकतेचा विषय ठरलाय...