BULDANA LIVE EXCLUSIVE निवडणुक आयोग सुसाट! आता पालिका प्रशासनालाही लावले कामाला!!  मंगळवारपासून प्रभाग रचनेचा दुसरा टप्पा

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'सर्वोच्च ' आदेशानंतर सुसाट वेगाने चार्ज झालेल्या राज्य निवडणूक आयोगाने आता  जिल्हाधिकाऱ्यांसह नगर परिषद प्रशासनालाही कामाला लावलंय! मागील काळात स्थगित करण्यात आलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम तात्काळ राबविण्याचे आदेश आयोगाने दिले असून दुसऱ्या टप्प्यासाठी जवळचाच म्हणजे १० मे चा मुहूर्त निर्धारित करण्यात आलाय! हा टप्पा मृग नक्षत्राच्या आगमनापर्यंत अर्थात ७ जून पर्यंत चालणार आहे.

यापूर्वी मागील फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेल्या  राज्यातील २०७ नगरपरीषदांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम लावण्यात आला.  यामध्ये जिल्ह्यातील ९ पालिकांचा समावेश होता. प्रारूप प्रभाग रचना झाल्यावर मागील १० ते १७ मार्च २०२२ दरम्यान
 त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या. मात्र त्यादरम्यान घडलेल्या घडामोडीत राज्याने निवडणुकांचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यामुळे १० मार्चच्या आसपास या कार्यक्रमाला आहे तिथेच 'थांबविण्यात' आले.  
 
पुन्हा सुरू

 या मजेदार पार्श्वभूमीवर आयोगाने सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. बुलडाणा पुरते सांगायचे सांगायचे झाल्यास ९ पालिकांची फेब्रुवारी मध्ये रचना करण्यात आली. त्यावेळी कमीअधिक १२१ प्रभाग आणि २४६ सदस्य संख्या राहील असे स्पष्ट झाले. देउलगावराजा १० , नांदुरा १२, खामगाव १७, जळगाव १०, बुलडाणा १५, चिखली १४, मेहकर १३, मलकापूर १५, शेगाव १५ अशी पालिका निहाय प्रभाग संख्या निर्धारित करण्यात आली. प्रभागांच्या या  प्रारूप रचनावर १० ते १४   मार्च दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहे.

मात्र याच टप्प्यावर स्थगित करण्यात आलेली या प्रक्रियाचा दुसरा टप्पा तिथूनच 'स्टार्ट अप'  करण्यात येणार आहे. हरकतीची मुदत केवळ ५ दिवसांची असून १० ते १४ मे दरम्यान हरकती सादर करता येतील. त्यावर २३ मे पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहे. हरकतींच्या अनुषंगाने अभिप्रायासह  जिल्हाधिकारी  आयोगाकडे  ३० मे पर्यंत अहवाल सादर करतील. निवडणूक आयुक्त ६ जून पर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील.७ जुनला  जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर अंतिम रचना प्रसिद्ध करावयाच्या आहेत. या कामासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमावा लागणार आहे.