BULDANA LIVE EXCLUSIVE निसर्गाला आव्हान करून पावसाळ्यात  इलेक्शन घ्यायचं म्हणताय? गत वर्षात झालता ११३ टक्के पाऊस! वाचा बुलडाणा लाइव्हचा स्पेशल पोस्टमार्टम रिपोर्ट; "घेता का चॅलेंज?" 

 
बुलडाणा ( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषिप्रधान जिल्ह्याचे खरीपाखालील क्षेत्र तब्बल साडेसात  लाख हेक्टर च्या आसपास, १३ तालुके व  भौगोलिक क्षेत्रफळ ९६६४ चौरस किलोमीटर असा अफाट पसारा अन पावसाची वार्षिक सरासरी ७६२.६ मिलिमीटर.. पण बहुतेकवेळा यापेक्षा जास्त पाऊस हजेरी लावतो.. सप्टेंबर संपला तरी ऑक्टोबर मध्येही  ( प्रेमळ भाषेत सांगायचे तर) परतीचा  ( अन गावरान भाषेत सांगायचे तर ) अवकाळी पाऊस हजेरी लावतोच...नमनालाच घडाभर तेल नव्हे तर आभाळपर पाऊस पाडायचे कारण काय? असा जटील प्रश्न सुज्ञ  वाचकांना पडणे स्वाभाविकच आहे. आता त्याच कारणबी तसं मजेदार हाय म्हणा!  'सुप्रिम' ने अलीकडेच  पावसाचा जिल्हा निहाय आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम लावण्याचे निर्देश दिलेत. कमी पावसाच्या ठिकाणी( पट्ट्यात) आता अन्  जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी नंतर निवडणुका घ्या असे सुचविण्यात आलंय!  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्जन्यमानाचे आणि गत वर्षाच्या पावसाचे  ' पोस्टमार्टेम' केले असता अनेक बाबी स्पष्ट झाल्या. याचा तपशील द्यायचा झाल्यास ती छोटेखानी पुस्तिकाच होईल.यामुळे जिल्ह्याच्या पर्जन्यमानाच्या हाय लाईट्स वर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. 

जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ७६१.६  मिमी इतके असून  सन २०२०- २१ मध्ये ६९२ मिमी पावसाने हजेरी लावली होती. सन  २०२१-२२ मध्ये  ७६४ (१००.३६ टक्के) पावसाची नोंद झाली होती. बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, खामगाव या  तालुक्यात १०२ ते १३५ टक्के दरम्यान इतका धोधो पाऊस झाला. उर्वरित ६तालुक्यात ७५  ते ९४ टक्के पावसाची नोंद झाली होती.  हा केवळ नियमित  म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान झालेला पाऊस होता.

४ तालुके हजारावर!

ऑक्टोबर पर्यंत पावसाची टक्केवारी ११३ टक्के झाली ! यामुळे सेंच्युरी गाठणाऱ्या वरील तालुक्यातील पावसाची टक्केवारी ११२ते १५० टक्के दरम्यान गेली.  उर्वरित तालुके शंभर टक्केच्या  घरात  पोहोचले. बुलडाणा ( १०५६मिमी) , सिंदखेडराजा ( १०४५ मिमी) , लोणार( १११८मिमी) व मेहकर ( १२५१मिमी) या तालुक्यांनी आजवरचे सर्व रेकॉर्ड धुवून काढले! ...

 अन... माहेवरी हिशोब!

दुसरीकडे जिल्ह्यातील पाऊस जूनपासूनच बरसायला सुरुवात करतो हे विशेष. मागील वर्षी जून महिन्याच्या सरासरी १३९ मिमीच्या तुलनेत १८३ मिमी म्हणजे १३१ टक्के पावसाने हजेरी लावली होती. जुलै च्या १९२ सरासरीच्या तुलनेत १९० मिमी,    ऑगस्टच्या २०७ मिमीच्या तुलनेत १३९ मिमी म्हणजे ६८ टक्के पाऊस झाला. सप्टेंबर ची सरासरी १२०  मिमी इतकी असून जिल्ह्यात २८१ मिमी म्हणजे २३३ टक्के पावसाची नोंद झाली होती. 
 
बोला घेता मग चॅलेंज?

आता पावसाचे अन पावसाळ्याचे हे नुसते आकडे आहेत. पूर, वीज पडणे, घरं कोसळणे, प्राणहानी, संपर्क तुटणे हे पराक्रम वेगळेच. चार महिने चालणारी खरीप हंगामाची धामधूम स्वतंत्र अध्याय ठरावा. यामुळे आता मोठ्या सायबानी ठरवावे, की पावसाशी खेटे घेत  पावसाळ्यात (विलक्षण) इलेक्शन घ्यायचे की नाय?        मोठ्यांच्या नादात लहानांनी पडू नये अशी रीत राहते. त्याच पालन केलेले बरं, नाही का ? ...