BULDANA LIVE EXCLUSIVE: ३ दशकांची निष्ठा पणाला ! सुवर्णमयी भूतकाळाला फारकत; अनिश्चित भविष्याचा स्वीकार !!
खा. जाधव यांच्या बंडाचा त्यांच्या वैयक्तिक राजकारनासह जिल्हा शिवसेना एवढेच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. मात्र हा संभाव्य परिणाम, परिवर्तन , झपाट्याने बदलणारे राजकारण भविष्यात जाधवांच्या अनुकूल राहते का, त्यांच्या सलग विजयाचा प्रताप आणि त्यांची जिल्ह्याच्या राजकारणातील दादागिरी कायम राहते काय ? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहे. या प्रश्नांची उत्तरे २०२४ वा कदाचित त्यापूर्वी होणाऱ्या लोकसभेच्या रण संग्रामात मिळतील. पण हे उत्तर खासदारांना वाटते तसे हमखास अनुकूल असेलच हे जाणकारांनाच काय, खुद्ध त्यांनाही खात्रीपूर्वक सांगणे कठीणच आहे.
सर्वस्व पणाला: तेंव्हाचे आणि आत्ताचे..!
ऐंशी, नव्वदीचे दशक म्हणजे राज्यासह जिल्ह्यासाठी राजकीय संक्रमणाचा काळ. काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व आणि राजकीय पटलावर शिवसेना व भाजप युतीची एन्ट्री असा संमिश्र काळ होता. त्याकाळात स्व. दिलीप रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकाराणाच्या अथांग सागरात पोहण्याचा सराव करणाऱ्या दिग्गज विरोधक तर सोडाच पण कुटुंबाचा पण विरोध असतांनाही प्रतापरावांनी हाती सेनेचा भगवा घेतला. रहाटे यांचे अकाली निधन झाल्यावर घरावर तुळशीपत्र आणि खांद्यावर सेनेची जवाबदारी घेतली. १९८९ मध्ये मेहकर खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवीत पहिल्या विजयाची गुढी रोवली. सन १९९० मध्ये विधानसभेत आमदार सुबोध सावजीकडून पराभव स्वीकारला. पण १९९२ मध्ये देऊळगाव माळी जिप सर्कल मधून विजय मिळविल्यावर नावातच प्रताप असलेल्या या नेत्याने मग कोणत्याही लढतीत पराभव स्वीकारला नाही. १९९५, सन १९९९ व २००४ च्या विधानसभेत विजय मिळवून त्यांनी हॅट्ट्रिक मारली.
यादरम्यान पाटबंधारे राज्यमंत्री पदही भूषविले. २००९ मध्ये मेहकर राखीव झाल्यावर आता काय? या प्रश्नावर त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजेंद्र भास्करराव शिंगणे या दिग्गज नेत्याचा पराभव करून मात केली.यानंतर सलग तीन वेळा खासदार होउन त्यांनी ५२ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या शिवराम राणेंच्या विक्रमाची बरोबरो केली. यानंतर जिल्हा शिवसेना त्यांच्या ताब्यात, संपर्कप्रमुख त्यांना असे चित्र निर्माण झाले.
साधा मेम्बरच काय आमदार कोण हे ठरविण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी आलं. यात मातोश्री अन ठाकरे कुटुंबीयांचा त्यांच्यावर असलेल्या कृपाशिर्वादाचा निर्णायक वाटा राहिला. पण महाबंड नंतर हे चित्र बदलले. अनेक दिवस तळ्यात मळ्यात असल्याचे दाखविणारा हा नेता प्रत्यक्षात ना. शिंदेशी ऑनलाइन संपर्कात होता, हे काल च्या ऑनलाईन आणि आजच्या ऑफलाइन भेटीने सिद्ध झाले. उमेदीच्या काळात पक्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या या नेत्याने आज आपली ३ दशकाची कारकीर्द, ठाकरेंचा विश्वास, निष्ठा, राजकीय भवितव्य पणाला लावले आहे.
प्रतापगड मधील ९० टक्के कार्यकर्त्यांची इच्छा डावलून ते शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने त्यांची कसोटी लागणार आहे. आजपर्यंत कधीही हार न मानणाऱ्या या मर्द मावळ्याला आता एकाधिकार सोडून त्यांना दिल्लीश्वरांच्या मर्जीवर चालावे लागणार हाय! त्यामुळे विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी त्यांना आतापर्यंत च्या सर्वात खडतर आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार हे उघड आहे.