भाजपला भगदाड!  जिल्हा परिषद निवडणुकीत खासदारपुत्राला धुळ चारणारा योद्धा राष्ट्रवादीच्या गोटात

 
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  २०१६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांना धूर चारणाऱ्या संजय वडतकरांनी आज, १२ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वडतकरांच्या हाती घड्याळ बांधले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी जिल्हा परिषद सर्कलचे ते माजी सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गडात मोठ्या सेनापतीशी लढाई करणारा योद्धा भाजपने गमावला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आधी शिवसेनेचे "निष्ठावान" असलेल्या वडतकरांना डावलून सेनानेतृत्वाने पुत्रमोहाला बळी पडत चिरंजीवांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे वडतकरांनी मोठ्या जिद्दीने लढाई लढून कमळ फुलवले होते. मात्र आता कमळ सोडून त्यांनी राष्ट्रवादीला जवळ केले.

त्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी एकत्रित लढली तर मोठ्या अपेक्षेने राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या वडतकरांना संधी मिळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वडतकर यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सदस्य  शिवप्रसाद मगर यांनीदेखील हाती घड्याळ बांधले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी उपस्थित होते.