BIG BREAKING पेरणी सोडून खासदार प्रतापराव जाधव मुंबईकडे रवाना! आमदार गायकवाड व आमदार रायमुलकरांचे मन वळविण्याची जबाबदारी! जमेल का ते..?

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पाचही जांगावर दणदणीत विजय मिळविल्यानंतर राज्याच्या राजकरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरात मध्ये असल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातले दोन्ही आमदार  खासदार प्रतापराव जाधव यांच्या मर्जीतील असल्याचे हेरून त्यांचे मन वळविण्याची जबाबदारी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यासाठी खासदार जाधव हे पेरणी सोडून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

खासदार प्रतापराव जाधव यांना दोन्ही आमदारांना बंड करण्यापासून परावृत्त करता येईल का? आमदारांचे मन वळविणे खासदार जाधवांना जमेल का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.  संजय रायमुलकर हे खासदार जाधव यांच्या खास जवळचे समजले जातात. तर शिवसेना, छावा संघटना,  राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा बऱ्याच पक्षांचा अनुभव गाठीशी असलेले आमदार संजय गायकवाड हे सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांचा शब्द खाली जाऊ देत नाहीत. त्यामुळे दोघांचे मन  वळविण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार जाधव यांना करावे लागणार आहे.

दरम्यान फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा व काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आता घरोबा नको अशी शिंदे समर्थक आमदारांची मागणी असल्याचे कळते.  एकनाथ  शिंदे यांच्यासोबत राहिल्यास जिल्ह्यातील दोघांपैकी एका आमदाराला मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे मंत्रीपद मिळण्याची शक्यता असताना आमदार खा. जाधवांचा शब्द खरचं पाळतील का अशीही चर्चा सुरू आहे.
  
खासदार जाधवांची काय इच्छा..!

दरम्यान खासदार प्रतापराव जाधव याआधी आमदार आणि तीनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळेस भाजपा शिवसेनेची युती होती. मात्र युती नसल्यास लोकसभेची जागा टिकवणे अवघड असल्याची जाण खासदार जाधव यांना आहे. वरवरून ते कितीही भाजपविरोधी बोलत असेल तरी भाजपसोबत जाण्याचे फायदे चाणाक्ष खासदार जाधव यांना माहीत आहेत. विशेष म्हणजे खासदार प्रतापराव जाधव स्वतः भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. त्यामुळे आमदार गायकवाड आणि रायमुलकर यांची मनधरणी करतांना ते किती प्रभावीपणे करतील हा प्रश्न उरतोच..!