' त्या' नंतर होऊ शकते राज्यपालांची उचलबांगडी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र जैन यांचे भाकीत!! म्हणाले मुंबई देशाची आर्थिक राजधानीच

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या  वादग्रस्त विधानाने महाराष्ट्र ढवळून आणि खवळून निघाला असताना त्याचे पडसाद दूरवरच्या बुलडाणा जिल्ह्यातही उमटले! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र जैन यांनी ट्वीटर वरून आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना नजीकच्या काळात कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी होऊ शकते अशी भाकीतवजा शक्यता वर्तविली आहे.

यापूर्वी अनेकदा राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांनी व निर्णयांनी राज्यात खळबळ उडाली आहे. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंबईमधून गुजराती, मारवाडी यांना काढले तर ती देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला. काही नेत्यांनी केंद्राने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. यामुळे सत्ताधारी भाजपा -शिंदे गटाची देखील राजकीय गोची झाली.  खासदार संजय राऊत यांनी सीएम एकनाथ शिंदे यांना खडा सवाल केला. प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री केंद्राशी बोलणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाशी असहमती व्यक्त केली.

  या पार्श्वभूमीवर जितेंद्र एन. जैन यांनी ट्विटर वरून आपल्या भावना व्यक्त करताना मुंबई देशाची आर्थिक राजधानी होती, आहे आणि राहणारच असे ठणकावून सांगितले. येत्या 1 वा 2 ऑगस्टला होणाऱ्या 'सुप्रिम' निकालानंतर केंद्रा ची नाचक्की होऊ नये म्हणून राज्यपालाची उचलबांगडी असे चित्र पहावयास मिळण्याची शक्यता टिवटीवाट द्वारे वर्तविली आहे. केवळ मराठी माणूसच नव्हे तर  पिढ्यानपिढ्या इथे राहणाऱ्या इतर प्रांतीय लोकांना सुद्धा या बेताल विधानाचा राग आला आहे. गुण्या गोविंदाने येथे राहणाऱ्या सर्व धर्म- जातीच्या लोकांमध्ये विष कालवायचे काम करू नये असे इशारावाजा आवाहन देखील जैन यांनी केले आहे.