राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल आ. सौ. महाले पाटील म्हणाल्या, सामान्यांच्या गळ्याला फास लावणारा अर्थसंकल्प!
अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, व्यापारी किंवा नोकरदार यांना कोणताही दिलासा दिलेला असल्याने कोणताही वर्ग या अर्थसंकल्पामुळे खुश झालेला नाही. शेतीच्या समृद्धीसाठी कोणत्याही नवीन योजना या आघाडी सरकारने जाहीर केल्या नाहीत. बुलडाणा येथे स्त्री रुग्णालय सुरू करण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र बुलडाणा येथील स्त्री रुग्णालय मंजूर असून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ सुद्धा मिळालेले आहे. तसेच स्त्री रुग्णालयाची भव्य इमारत सुद्धा तयार असून दुर्दैवाने अजून बुलडाणा येथे स्त्री रुग्णालय सुरू झालेले नाही.
याचाच अर्थ जुन्या कामांनाच नवीन मुलामा देण्याचे काम या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांना निधीच द्यायचा नाही असे या सरकारने ठरविलेले दिसते. अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्याचे जरी अर्थमंत्र्यांनी सूतोवाच केले असले तरी कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जाहीर केलेल्या वाढीव मानधनाबाबत ब्रसुद्धा काढलेला नाही. २००५ नंतर शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना पेन्शन बाबत कोणतीही भूमिका या आघाडी सरकारने दाखविली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ब वर्ग तीर्थक्षेत्राबाबत कोणतीही मिटिंग झालेली नसल्याने एकाही प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही.
ज्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्य करणाऱ्या या आघाडी सरकारने बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवन योजना सुरू केलेली आहे. पण या योजनेतून आलेले सर्व प्रस्ताव धूळखात पडलेले आहे. एसटीच्या विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय या सरकारने घेतलेला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधाराच्या गर्तेत आहे. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याबाबत कोणतीही आशा निर्माण करण्यास हे शासन अपयशी ठरले आहे. सरकारी खर्चात प्रचंड वाढ झाली असून, २४ हजार कोटींच्या महसुली तूटीचा हा अर्थसंकल्प कोणत्याही समाज घटकाला न्याय न देता दिशाहीन, भरकटलेला असा आहे, असेही आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी म्हटले आहे.