POLITICAL SPECIAL जिल्ह्यात भाजपचे ४ आमदार तरीही पालकमंत्री राष्ट्रवादीचा.! गुलाबराव पाटलांनी, वळसे पाटलांनी काय दिवे लावले? राजकीय वर्चस्वाच्या लढाईत जिल्ह्याच्या हिताचा बळी..!

 
 बुलडाणा(कृष्णा सपकाळ :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): परवा रात्री उशिरा राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, बुलढाणा जिल्ह्यातही सात पैकी सहा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले, त्यात तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खामगावच्या आकाश फुंडकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यामुळे यावेळी पालकमंत्री आपल्याला हक्काचा मिळेल, आपल्या घरचा मिळेल अशी अपेक्षा सबंध जिल्हा वासियांना होती..मात्र कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक, जिल्हा वासियांची अपेक्षा यावेळीही फोल ठरली..लांब दूरवरच्या सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटलांना बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली..
मकरंद जाधव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे आहेत. तसे पहिले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे बुलडाण्यात एकच आमदार आहेत. त्याउलट भाजपचे चार आमदार जिल्ह्यात आहेत, त्यातील आकाश फुंडकर मंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री या नात्याने पालकमंत्री म्हणून आकाश फुंडकर यांना संधी मिळावी अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र भाजपच्या उर्वरित तीन आमदारांची ती होती की नाही? असा सवाल उपस्थित होणे आता स्वाभाविक आहे. फारसे चर्चेत आणि स्पर्धेत नसताना आकाश फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्याआधी डॉ.संजय कुटे आणि श्वेताताई महाले यांचे नाव चर्चेत होते. विशेष म्हणजे आकाश फुंडकर यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनाच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशा मागणीचे निवेदन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोर लावला असता तर पालकमंत्री पद नक्कीच आकाश फुंडकर यांनाच मिळाले असते अशी चर्चा आता सुरू आहे..
 
जिल्ह्याच्या हिताचा बळी...

जिल्ह्यात विकासात्मक योजना राबवण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास अवगत असणाऱ्या व्यक्तीच्या हातात अशी जबाबदारी दिली तर त्याचा फायदा अधिक होतो. आकाश फुंडकर यांना मंत्रिपद मिळाल्याने यावेळी तशी संधी निर्माण झाली होती. मात्र राजकीय वर्चस्वाच्या लढाईतूनच आकाश फुंडकर यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून दूर केल्याचे बोलल्या जात आहे.मागील ५ वर्षांत गुलाबराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले होते, मात्र त्यांच्या कार्यकाळात पालकमंत्री शोधा आणि बक्षीस मिळवा असे पोस्टर्स व्हायरल झाले होते. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात ते क्वचितच दिसले, त्यामुळे बाहेरचा पालकमंत्री असल्यास काय होऊ शकते याचा एवढा अनुभव असून देखील जिल्ह्यातील आमदारांनी राजकीय वर्चस्वाच्या लढाईत जिल्ह्याच्या हिताचा बळी दिला तर नाही ना? अशी कुजबूज आता होऊ लागली आहे...