33 पैकी दोनच ग्रामपंचायती ठरल्या भाग्यशाली! 26 फेब्रुवारीला होणार सरपंचपदाची निवड
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः आरक्षणामुळे 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तब्बल 33 सरपंचपदांची निवड न झाल्याने हे पद रिक्त राहिले होते. यासाठी असलेल्या पर्यायी नियमांमुळे यातील 2 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी 26 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यातील 526 ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक 3 टप्प्यांत पार पडली. मात्र सरपंच पदासाठी निघालेल्या आरक्षणाचा सदस्यच नसल्याने तेथील निवडणुका लांबणीवर पडल्या. यापैकी देऊळघाट ( ता. बुलडाणा) व नारखेड (ता. नांदुरा) या ग्रामपंचायत सरपंच पदाचा तिढा सुटला आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच निवडणूक) नियम 1964 मधील तरतुदींच्या आधारे यावर तोडगा काढण्यात आला. यामुळे दोन्ही ठिकाणचे आरक्षण एससी महिला ऐवजी अनुसूचित जाती असे करण्यात आले. यामुळे तेथील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 26 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात पहिली सभा पार पडणार आहे. यापूर्वी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 2 वाजता सभा सुरू झाल्यावर छाननी व माघार हे सोपस्कार झाल्यावर आवश्यक असेल तर मतदान घेण्यात येणार आहे.