मतमोजणी सुरू होऊन २३ तास उलटले! अजूनही अमरावती पदवीधर मतदार संघाचा निकाल लागेना; लिंगाडेंची आघाडी कायम! दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू! वाचा रात्री काय काय झालं अन् पुढे काय होईल..
एकूण मतांच्या मतमोजणीनंतर रात्री साडेदहाच्या सुमारास ९३ हजार ८५२ मते वैध तर ८७३५ मते अवैध ठरवण्यात आली होती. त्यावेळी लिंगाडे यांना ४३ हजार ३४३ तर रणजित पाटील यांना ४१हजार ५ इतके मते मिळाली होती. एकूण झालेल्या मतांतून बाद झालेली मते वगळून विजयासाठी ४६ हजार ९२७ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र त्याचवेळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी बाद झालेल्या ८ हजार ७३५ मतांची फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली.
त्यामुळे मध्यरात्री १२ नंतर १५ टेबल वर बाद मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. अखेर ८८३५ पैकी ३४८ मते वैध ठरवण्यात आली.त्यातील १४५ मते रणजित पाटलांना तर १७७ मते धिरज लिंगाडे यांच्या पारड्यात पडली. मात्र एवढे होऊनही विजयाचा कोटा दूर असल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत कमी मते मिळवणारे १० उमेदवार बाद करण्यात आले आहेत. त्यांच्या मतपत्रिकेवर ज्यांना दुसऱ्या पसंतीची मते आहेत, त्यांचे वाटप त्या त्या उमेदवारांना करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी डॉ.प्रवीण चौधरी, अरुण सरनाईक, अनिल अंमलकार या बऱ्यापैकी मते मिळवलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते मोजल्यानंतरच विजयी उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत. त्यावरही कोटा पूर्ण झाला नाही तर तिसऱ्या पसंतीची मते मोजल्या जातील..काहीही करून कोटा पूर्ण झालाच नाही तर निर्धारित कोट्याच्या जवळपास असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केल्या जाईल. निकाली हाती येण्यास आज,३ फेब्रुवारी दुपारपर्यंतचा वेळ लागू शकतो.