खा.राहुल गांधींच्या फोननंतर रात्रीच थांबल्या १५० गाड्या! राहुल बोंद्रेंची सकाळची पोस्ट चर्चेत; ‘ राहुल गांधी यांच्या लढ्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी!
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. रात्रीच मुंबईला जाण्यासाठी तब्बल १५० गाड्या रवाना होणार होत्या; मात्र रात्रीच या गाड्या थांबवण्यात आल्या. अनेक कार्यकर्ते मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना प्रवेश रद्द झाल्याची माहिती पोहोचली आणि संपूर्ण नियोजनच बदलले. राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात फोनवरून संवाद झाला. या संवादानंतर सगळ वातावरण फिरल..राहुल बोंद्रे यांचा फोन रात्री स्विच ऑफ झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्यासही नकार दिला.
या संपूर्ण घडामोडीत आता २२ सप्टेंबरच्या सकाळी राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर केलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. ‘राहुल गांधी यांच्या लढ्यात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी’ असा संदेश देत बोंद्रे यांनी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ अशी पोस्ट केली आहे. भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत राहुल गांधी यांच्याशी झालेला भावनिक संवाद आणि त्यानंतरची ही पोस्ट, यामुळे बोंद्रे यांनी पुन्हा काँग्रेससोबत राहण्याचा स्पष्ट राजकीय संदेश दिल्याचे चित्र आहे. राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना काँग्रेससोबत राहण्याचे आवाहन केल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. विशेष म्हणजे, राहुल गांधींसोबतच्या संवादादरम्यान राहुल बोंद्रे भावुक झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या संवादात राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना आपण त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिल्याचे दिसते. त्यानंतरच बोंद्रे यांच्या भूमिकेत बदल झाला आणि भाजप प्रवेश रद्द झाला. या संपूर्ण घटनाक्रमाला आता त्यांच्या सकाळच्या ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या पोस्टने आणखी राजकीय अर्थ प्राप्त झाला आहे.
रात्री बोंद्रे यांच्या घराबाहेर हजारोंचा जमाव, काँग्रेसच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर, मुंबईकडे जाणाऱ्या १५० गाड्या ऐनवेळी थांबवणे, राहुल गांधींचा फोन, त्यानंतर बोंद्रे यांचा फोन बंद होणे, माध्यमांपासून अंतर आणि सकाळी थेट ‘राहुल गांधी यांच्या लढ्यात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी’ अशी पोस्ट—या घटनाक्रमाने चिखलीच्या राजकारणाला अक्षरशः नाट्यमय वळण मिळाले आहे. भाजप प्रवेश रद्द करण्याच्या या संपूर्ण प्रकरणानंतर बोंद्रे कोणती राजकीय लढाई उभी करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होणार असली, तरी एका रात्रीत बदललेले हे राजकीय चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे.