जिल्ह्यात १० लाडक्या बहिणी लढल्या; विजय एकीचाच; ७ बहिणींचे डिपॉझिट जप्त....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी मतदानाची टक्केवारी वाढवली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केवळ एकाच महिला उमेदवाराच्या पदरात विजयाचे कमळ पडले आहे. सहा मतदारसंघांत उभ्या असलेल्या दहा महिला उमेदवारांपैकी ९ उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. मलकापूर मतदारसंघात तर एकाही महिलेला उमेदवारी मिळालेली नाही. ७ महिला उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात यंदा राजकीय पक्षांनी हात आखडता घेतला होता. राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेरघर असलेल्या जिल्ह्यातही महिला उमेदवारांची संख्या कमी होती. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांत महिलांना उमेदवारी मिळाली. बुलढाणा मतदारसंघात जयश्री शेळके यांनी अखेरपर्यंत लढत दिली; मात्र त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. जळगाव जामोद मतदारसंघात डॉ. स्वाती संदीप वाकेकर यांनीही चांगले मते मिळवली. त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. सिंदखेड राजामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या सविता शिवाजी मुंढे यांना १६ हजार ६५८ मते मिळाली. त्या या मतदारसंघात चौथ्या क्रमांकावर राहिल्या. मेहकर मतदारसंघात वंचितच्या डॉ. रुतुजा चव्हाण तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
महिला उमेदवारांना मिळालेली मते...
श्वेता विद्याधर महाले– १०९२१२
 जयश्री सुनील शेळके–९०८१९
डॉ. स्वाती संदीप वाकेकर–८८५४७ 
सविता शिवाजी मुंढे–१६६५८
 डॉ ऋतुजा ऋषांक चव्हाण–२०५४
 अश्विनी विजय वाघमार–६५४
 जयश्री रवींद्र शेळके–६५१
 गायत्री गणेश शिंगणे –५५८
पूनम विजय राठोड –३५९
रेणुका विनोद गवई–८०