मोदी सरकार, भाजपविरोधात ममतादिदींचा पुन्हा एकदा एल्गार
एनसीटी विधेयकावरून विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न; अनेक नेत्यांना लिहिली पत्रे
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ममता बॅनर्जीं सत्तेची हॅटट्रीक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.दुसरीकडे भाजप किमान २०० जागा जिंकून प.बंगालची सत्ता मिळवू असा दावा करत आहे. या घाईगडबडीत ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व प्रमुख विरोधी, प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून त्यांनी नॅशनल कॅपटिल टेरेटरी (एनसीटी) विधेयकाला सर्वांनी एकजूट होऊन विरोध करावा, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन, आपचे नेता अरविंद केजरीवाल, बिजद नेता नवीन पटनायक,वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ.फारुक अब्दुल्ला,मेहबुबा मुफ्ती, सीपीएमचे दीपांकर भट्टाचार्य, सपाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, झामुमो नेते हेमंत सोरेन आदीं नेत्यांना पत्र लिहून मोदी सरकारने लोकसभेत मंजूर केलेल्या नॅशनल कॅपिटल टेरेटरी (एनसीटी) विधेयकाला
विरोध करण्याची ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे. या पत्रात ममतांनी हे विाधेयक म्हणजे भारतीय संघराज्य प्रणालीला धक्का लावण्याचा व राज्यांऐवजी सर्व सूत्रे केंद्र सरकारच्या अधिकारात यावीत यासाठीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारचे पंख छाटण्यासाठी व उपराज्यपालांना जादा अधिकार बहाल करणारे एनसीटी विधेयक लोकसभेसह राज्यसभेतही मंजूर झाले असून राष्ट्रपतींनी त्यावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे.परंतु राज्यपालांना हाताशी धरून भाजप प्रत्येक राज्य सरकार कमकुवत करत आहे, राजकारण करत आहे,असा ममता बॅनर्जींचा आरोप आहे.