बागेत मैत्रिणीसोबत फिरायला गेला, गावकऱ्यांनी लग्न लावून दिलं तर केली आत्महत्या!
कोलकात्ताः पश्चिम बंगालमधील एक तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत माल्दा येथील एका बागेत फिरायला गेले होते. तिथं ते एकांतात बसल्याचं काहींनी त्यांना पाहिलं. त्यांना पकडून गावात आणलं. या तरुणाचं आणि त्याच्या मैत्रिणीचं काही पंचांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं. या लग्नानंतर युवकानं आत्महत्या केली.
माणिक मंडल हा वीस वर्षांचा तरुण मैत्रिणीसोबत बागेत बसले होते. गावातील काही नेत्यांनी त्यांना पाहिलं. या नेत्यांनी त्या दोघांना सोबत घेतलं. पंचायत भरवली. पंचांनी या दोघांचं लग्न लावून देण्याचं जाहीर केलं. दोघांना शिक्षा म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं जाणार असं सांगितलं. या दोघांना पंचांनी एका मंदिरात नेलं आणि लग्न लावून दिलं. लग्नानंतर या सर्वांनी लग्न लावून दिलेल्या दोघांना माणिकच्या घरी सोडलं. माणिकच्या आईनं या लग्नाला मान्यता देण्याचं नाकारलं. गावातील कोणीही या दोघांचं म्हणणं ऐकलं नाही. माणिक आणि त्याच्या आईचे वाद झाले. या वादानंतर माणिकनं आत्महत्या केली. या गावामध्ये तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे. या पक्षाच्या नेत्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं.