धावत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणीवर दोन तरुणांचा बलात्कार
नवी दिल्ली ः नोकरीसाठी लावतो असे म्हणून धावत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी बलात्कार केला. ही घटना इशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात समोर आली आहे. तिने विरोध केला असता दोघांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. बलात्कारानंतर तिला रस्त्यातच सोडून तरुण पसार झाले. तिने हेल्पलाइनला कॉल केल्यानंतर तिला तातडीने मदत पुरविण्यात आली व रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस कारच्या नंबरच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
सहा महिन्यांपासून पीडित तरुणी पतीसोबत गाझियाबादमध्ये किरायाने राहते. तिचा पती ट्रकचालक आहे. तो सध्या मध्यप्रदेशात आहे. कामाच्या शोधात असतानाच काही दिवसांपूर्वी तिला एका अज्ञात नंबरवरून फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने रोहित असे नाव सांगून तिला नोकरीला लावण्याबद्दल बोलला. माझ्या भावाचं दिल्लीत कापड दुकान असून, तिथे तुला नोकरीला लावतो असे सांगून चांगल्या पगाराचेही आमिष दाखवले. १६ ऑगस्टला तिने त्याला कॉल केला असता दोघांची भेट झाली. कारमध्ये रोहितचा मित्र होता. दोघांनी तिला कारमध्ये बसवून दिल्लीच्या दिशेने नेले. रस्त्यातच तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला.