दिदींनी बंगाल जिंकले!
भाजपला धूळ चारत ममता बॅनर्जींची हॅट्ट्रिक; हा बंगाली जनतेचा विजय – ममता बॅनर्जी
————
पश्चिम बंगाल
तृणमूल काँग्रेस 215 (लीड/विजयी)
भाजप 74 (लीड/विजयी)
इतर – 03 (विजयी)
कोलकाता : अत्यंत चुरशीच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपला धूळ चारत विजय संपादन केला आहे. निवडणूक निकालाच्या पहिल्या चार तासांतच तृणमूलने बहुमताचा जादुई आकडा ओलांडून 200 पेक्षा जास्त जागा जिंकून विजयी सलामी दिली. दुसरीकडे, नंदीग्राम मतदारसंघातून खुद्द ममता बॅनर्जी यांचा अवघ्या 1200 मतांच्या फरकाने विजय झाला. दुसरीकडे, 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जिंकण्याचा दावा करणारे भाजपचे वरिष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांचा मात्र धक्कादायक पराभव झाला आहे. बंगालचा ममता बॅनर्जी यांचा रोमहर्षक विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दारूण पराभव मानला जात आहे.
तब्बल 62 दिवस चाललेल्या निवडणुकीचे अपेक्षित निकाल हाती येत आहेत. बंगाल, केरळ व आसाम राज्यात सत्तातर होऊ शकले नाही. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये एलडीएफ आणि आसाममध्ये भाजपची सत्ता आली आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये सत्तांतर झाले असून, डीएमके प्रदीर्घ काळानंतर सत्तेवर आले आहे. या चारही राज्यात भाजपला लोकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम बंगाल देशाचे राजकारण बदलणार!
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला जनतेने नाकारले आहे. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न मात्र भाजपने केला आहे. यापूर्वी भाजपने गेली तीन दशके सत्ता सांभाळणार्या डाव्या पक्षांना भाजपने सत्तेतून दूर सारले होते व आता डाव्याचे अस्तित्व अगदीच नगण्य झाल्याचे दिसून येत आहे. या शिवाय, ओवेसींच्या एमआयएमनेदेखील ग्रामीण व शहरी भागात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. या सर्वांशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाघिणीसारखी एकटीनेच टक्कर दिली होती. बंगाली जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह या जोडगोळीला रोखण्यात एकट्या बॅनर्जी या यशस्वी ठरल्या असून, त्यांच्या विजयानंतर देशातील राजकीय समिकरणे आता चांगलीच बदलणार आहेत.