तीस वर्षांनंतर उघडला तिचा जबडा; पण त्यासाठी करावे लागले ऑपरेशन!
दिल्लीच्या डॉक्टरांनी महिलेला महत्प्रयासाने जीवदान
नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक असाध्य आजार, आरोग्य समस्यांवर उपाय शोधता यायला लागले आहेत. राजधानी नवी दिल्लीत एका बँकेत काम करणार्या महिला अधिकार्याचे तोंड (जबडा) गेल्या ३० वर्षांपासून बंद होता.या महिलेमध्ये जन्मजात ही समस्या होती. परिणामी तिला कुठलेच पदार्थ, वस्तू खाता येत नव्हती. गेल्या तीस वर्षांपासून ती केवळ द्रवरुप पदार्थांवरच जीवंत होती. पण दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या जबड्यावर अतिशय कष्टाने शस्त्रक्रिया करून तिचा जबडा उघडण्यात यश मिळवले. त्यामुळे आता ही महिला सर्वसामन्य जीवन जगू शकणार असून आयुष्यात पहिल्यांदाच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार आहे.
नवी दिल्लीत आस्था नावाची एक तरुणी बँकेत काम करते. तिच्या जबड्यांची ठेवण जन्मापासूनच सर्वसामान्यांसारखी नव्हती. जबड्यांतील हाड तोंडाच्या दोन्ही बाजूंनी कवटीच्या हाडाला जुळलेले होते. त्यामुळे ती आपले तोंड उघडू शकत नव्हती. इतकेच नव्हे तर आपल्या बोटांनी तोंडातील जीभेलाही स्पर्श करू शकत नव्हती. कुठलाच घट, टणक पदार्थ तिला खाता येत नव्हता. केवळ लिक्विड (पातळ) पदार्थ खाऊनच ती इतकी वर्षे जीवंत होती. इतकेच नव्हे तर ती एका डोळ्याने पाहूदेखील शकत नव्हती.तिच्या दातांची वाढ अर्धवट झाली होती.शिवाय सर्वात मोठी अडचण म्हणजे तिचा चेहरा रक्ताळलेल्या नसांनी भरलेला दिसत असे.त्यामुळे कुठलेच रुग्णालय किंवा तज्ज्ञ तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते. परंतु सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत त्या महिलेच्या चेहर्यावर २० मार्च रोजी तब्बल साडेतीन तास प्रयत्न करून कठीणात कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली व तिचा जुडलेला जबडा कवटीपासून विलग केला. त्यामुळे आता आस्थाचे तोंड तीन सें.मी.पर्यंत उघडू शकत आहे.